लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. शाळाही सुरू झाल्या आहेत. आपली बसमध्ये प्रवाशांची संख्या वाढत असून, दररोज ५० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. मनपाला दररोज ८ ते ९ लाखांचे उत्पन्न होत आहे. यामुळे परिवहन समितीने १ फेब्रुवारीपासून पुन्हा १०० बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतरही बसची संख्या वाढविली नाही. गर्दीमुळे विद्यार्थी व प्रवाशांना कोविड संक्रमण झाल्यास याला सर्वस्वी मनपा आयुक्त जबाबदार राहतील, असा आरोप परिवहन सभापती बाल्या बोरकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
परिवहन व आरोग्य सेवा उपलब्ध करण्याची जबाबदारी मनपाची आहे. परंतु मनपा प्रशासनाला आपल्या तिजोरीची चिंता आहे. सर्वच शहरातील बस सेवा तोट्यात आहे. प्रशासनाचा तोटा कमी ठेवण्याचा विचार हा बस सेवेला ग्रहण लावण्याचे काम करीत आहे. पूर्र्ण क्षमतेने बस चालविल्यास मनपाला दररोज २० ते २२ लाखांचे उत्पन्न होते. नागरिकांनाही सुविधा होईल. मनपा आयुक्तांनी आपला हेकेखोरपणा सोडून नागरिकांच्या हिताचा विचार करून बस सेवा पूर्ण क्षमतेने चालविण्याचा निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे बोरकर म्हणाले.
सध्या १७२ बस धावत आहेत. समितीने एक मताने १०० बस पुन्हा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मनपा प्रशासन व डिम्टस यांच्यात झालेल्या कराराची प्रत मागील काही महिन्यापासून मागत आहे. परंतु प्रशासन वा डिम्टस यांच्याकडून ही प्रत उपलब्ध झालेली नाही. कराराचे उल्लंघन करून डिम्टसला लाभ होण्यासाठी मनपातील काही अधिकारी प्रयत्न करीत आहेत. करारातील काही पाने बेपत्ता केली असावी, असा आरोप बोरकर यांनी केला.
डिम्टस तिकीट चेकर्सच्या नावाखाली २५ हजार घेत आहे. परंतु त्यांना दरमहिन्याला ८ हजार देत आहे. यात मोठा घोटाळा आहे. दिल्लीत बसलेल्या ८ अधिकाऱ्यांच्या वेतनावर दर महिन्याला लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे. याला आळा बसावा, यासाठी डिसेंबर महिन्यात प्रशासनाला पत्र दिले. परंतु कोणतीही कारवाई झाली नाही, अशी माहिती बोरकर यांनी दिली.