लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रशियामध्ये सुरू झालेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डचा ज्वर जगभरात दिसून येत आहे. भारतातील तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध फुटबॉलपटू त्यांची माहिती मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहे. रात्री उशिरापर्यंत जागून सामने बघितले जात आहे. फुटबॉलच्या महाकुंभाकडे जगभरातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले असताना, नागपुरातील रूपकिशोरने केलेला फुटबॉलशी निगडित काही दुर्मिळ वस्तूंचा संग्रह अनोखा ठरतोय.महाल परिसरात राहणारे रूपकिशोर कनोजिया संग्राहक म्हणून प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या विषय आणि थीमवर त्यांचा संग्रह आहे. सध्या सुरू असलेल्या फुटबॉल वर्ल्डकपमुळे रूपकिशोरने आपल्या घरीच फुटबॉलच्या संग्रहाचे छोटेखानी प्रदर्शन भरविले आहे. सध्या तरुणाईच्या तोंडावर इंग्लंड, ब्राझिल, जर्मनी, फ्रान्स, स्पेन या देशातील खेळाडू पॉल, लुकाकु, मेसी, रोनाल्डो, बेंजेमा, नेऊर, अग्युरो, नेमार, कवानी, डी मारिया, ग्रिझमन यांची नावे आहेत. रूपकिशोरने हे खेळाडू ज्या फुटबॉल क्लबकडून खेळून मोठे झाले आहे त्या क्लबच्या बॅचेसचा संग्रह केला आहे. इंग्लंड, नॉर्थलॅण्ड, आयर्लंड, स्कॉटलंड या युरोपीय देशातील ७६ प्रसिद्ध क्लबचे बॅचेस त्याच्याकडे आहे. शंभर ते दीडशे वर्षे जुने या क्लबने दिग्गज खेळाडू दिले आहेत. १८५७ मध्ये इंग्लंडमध्ये सर्वप्रथम सुरू झालेला शेफिल्ड फुटबॉल क्लबचे बॅचेस त्याच्याकडे आहे. त्याचबरोबर रोमानिया देशाने १९९० मध्ये काढलेले फुटबॉलचे स्पेशल कव्हर त्याच्या संग्रहात आहे. फुटबॉलवर विविध देशाने काढलेल्या पोस्टाच्या तिकीट त्याच्याकडे बघायला मिळतात. भारताला क्रिकेटवेडा देश म्हटले जाते. १९३० पासून फुटबॉल वर्ल्डकपच्या इतिहासात भारत सहभागी होऊ शकला नसला तरी, भारत सरकारने २०१४ मध्ये ब्राझिल येथे झालेल्या फुटबॉल वर्ल्डकपनिमित्त फुटबॉलची स्पेशल मिनिचर शीट व इन्व्हलप प्रसिद्ध केले आहे. हे रूपकिशोर यांच्या संग्रहात आहे. त्याचबरोबर फुटबॉलशी संबंधित काही दुर्मिळ माहिती, वृत्तपत्रातील फोटो, फुटबॉलशी संबंधित मॅगझिन त्याच्या संग्रही आहे. रूपकिशोरच्या फुटबॉल संग्रहाला आॅल इंडिया न्यूमॅस्मॅटिक स्पर्धेत गौरविण्यात आले आहे. हा अनमोल ठेवामी एक संग्राहक आहे. वेगवेगळ्या विषयांवर संग्रह करण्याची मला आवड आहे. फुटबॉलसारख्या जगप्रसिद्ध खेळाचा संग्रह माझ्याजवळ असल्याचा मला अभिमान आहे. मी वेगवेगळ्या विषयांवर संग्रह करण्यासाठी वेळ, पैसा, श्रम खर्ची घातला आहे. हा अनमोल ठेवा आहे, सर्वसामान्यांना त्याची किंमत नसली तरी तो माझ्याजवळ असल्याचे समाधान आहे.रूपकिशोर कनोजिया, संग्राहक
फुटबॉलच्या महाकुंभात रूपकिशोरचा संग्रह ठरतोय आगळावेगळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 21:02 IST
रशियामध्ये सुरू झालेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डचा ज्वर जगभरात दिसून येत आहे. भारतातील तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध फुटबॉलपटू त्यांची माहिती मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहे. रात्री उशिरापर्यंत जागून सामने बघितले जात आहे. फुटबॉलच्या महाकुंभाकडे जगभरातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले असताना, नागपुरातील रूपकिशोरने केलेला फुटबॉलशी निगडित काही दुर्मिळ वस्तूंचा संग्रह अनोखा ठरतोय.
फुटबॉलच्या महाकुंभात रूपकिशोरचा संग्रह ठरतोय आगळावेगळा
ठळक मुद्देजगभरातील ७६ फुटबॉल क्लबच्या बॅचेस : पोस्टल तिकीट, मिनिचर शीट व दुर्मिळ माहितीही