पारा १०.९ अंशावर : नागपूरकरांना दिलासा, गोंदियात थंडीची लाट कायम नागपूर : गत तीन दिवसांपूर्वी म्हणजे, १३ जानेवारी रोजी उपराजधानीतील पारा तब्बल ७.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसल्यानंतर आता तो पुन्हा हळूहळू वर चढू लागला आहे. यासोबतच नागपूरकरांना कडाक्याच्या बोचऱ्या थंडीपासून दिलासा मिळाला आहे. सोमवारी नागपुरात किमान १०.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. याशिवाय हवामान खात्याने पुढील २२ जानेवारीपर्यंत नागपुरातील किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र त्याचवेळी गोंदिया येथे कडाक्याच्या थंडीची लाट कायम असून, येथे किमान ७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांत विदर्भासह उपराजधानीतील कडाक्याच्या थंडीची लाट उसळली होती. यात १३ जानेवारी रोजी पारा हा ७.२ अंशापर्यंत खाली आला होता. हा यावर्षीचा सर्वांत थंड दिवस होता. या कडाक्याच्या थंडीने संपूर्ण विदर्भाला हुडहुडी भरली होती. यात संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. पारा हा ७ अंशापर्यंत खाली आल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. विशेष म्हणजे, यापूर्वी मागील १९ डिसेंबर रोजीसुद्धा नागपुरातील पारा हा ७.८ अंशापर्यंत खाली घसरला होता. शिवाय ८ ते ९ डिसेंबर दरम्यान तो ८ ते १० अंशावर राहिला होता. साधारण दरवर्षी डिसेंबर महिन्यातील शेवटी कडाक्याच्या थंडीचा जोर वाढतो. मात्र हे वर्ष त्याला अपवाद ठरले आहे. वर्षाच्या शेवटच्या तीन दिवसांत थंडीचा जोर कमी झाला होता. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार सोमवारी नागपूर येथे किमान १०.९ अंश सेल्सिअस, अकोला येथे १५.५ अंश सेल्सिअस, अमरावती ११.६ अंश, बुलडाणा १६.०, ब्रम्हपुरी ११.२, चंद्रपूर १२.२, गोंदिया ७.६, वर्धा ११.६, वाशिम १४.४ आणि यवतमाळ येथे १५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)४७ वर्षांपूर्वी पारा ३.९ अंशावर जाणकारांच्या मते, मागील ४७ वर्षांपूर्वी ७ जानेवारी १९३७ रोजी नागपुरातील पारा चक्क ३.९ अंशापर्यंत खाली घसरला होता. तो आजपर्यंतच्या सर्वाधिक थंडीचा विक्रम राहिला आहे. तसेच मागील १० जानेवारी २०१५ रोजी नागपुरातील पारा हा ५.३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. मात्र यावर्षी नागपूरकरांना तशा थंडीचा सामना करावा लागला नाही. आतापर्यंत नागपुरातील पारा हा ७ अंशापेक्षा खाली घसरलेला नाही.
कडाक्याच्या थंडीचा जोर ओसरला
By admin | Updated: January 17, 2017 02:09 IST