नागरिकांनीच स्वीकारावी 'सायकल' केंद्रित जीवनशैली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 09:43 PM2020-08-21T21:43:32+5:302020-08-21T21:45:18+5:30

प्रदूषण कमी करण्यासाठी ‘मोटरलेस व्हेईकल’ संकल्पना म्हणजे पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचा कमीत कमी वापर होईल अशी जीवनशैली स्वीकारावी लागेल आणि त्यासाठी सायकल हा सर्वोत्तम पर्याय आहे.

Citizens should adopt a 'cycle' centered lifestyle | नागरिकांनीच स्वीकारावी 'सायकल' केंद्रित जीवनशैली

नागरिकांनीच स्वीकारावी 'सायकल' केंद्रित जीवनशैली

Next
ठळक मुद्दे ‘सायकल ट्रॅक’ संकल्पना सत्यात यावीफिटनेस व प्रदूषणमुक्तीचाही मंत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये नागपूर शहर चौथ्या क्रमांकावर आहे आणि यात वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषण‘चा वाटा १७.२ टक्के एवढा आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी ‘मोटरलेस व्हेईकल’ संकल्पना म्हणजे पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचा कमीत कमी वापर होईल अशी जीवनशैली स्वीकारावी लागेल आणि त्यासाठी सायकल हा सर्वोत्तम पर्याय आहे. ही केवळ प्रदूषण कमी करण्यासाठी नाही तर फिटनेससाठीही महत्त्वाची आहे, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक राहुल सावंत यांनी दिली.

जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून राजधानी दिल्लीची ओळख होती पण ती आता पुसली जात आहे. लॉकडाऊन राजधानीसाठी लाभदायक ठरला. मात्र एवढ्यावरच न थांबता आता दिल्लीमध्ये ‘सायकल मेयर’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. किमान शनिवार व रविवारी मोटर वाहनाऐवजी केवळ सायकल वापरण्याचा निर्धार लोकांनी केला आहे. ही संकल्पना नागपूर शहरानेही स्वीकारण्याची गरज आहे. राहुल सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरच्या मेट्रो रेल्वेच्या प्लॅनमध्ये ‘डेडिकेटेड सायकल ट्रॅक व पार्किंग’ या संकल्पनेचा समावेश आहे. त्यानुसार प्रत्येक स्टेशनवर सायकल पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र लोकांचा प्रतिसाद नसल्याने सायकल ट्रॅकचे नियोजन फिस्कटले आहे.

विशेष म्हणजे नवी मुंबई व खारघर येथे सायकल ट्रॅकची संकल्पना राबविली आहे आणि सायनसह इतर भागात ती प्रस्तावित आहे. मग नागपूरला का नाही, हा प्रश्न आहे. त्यामुळे नागपूरकर सायकल वापराबाबत जागरूक नाहीत, असा अर्थ निघतो. थोड्या थोड्या अंतरावरही पायी किंवा सायकलचा उपयोग न करता ‘मोटर’ वाहन काढले जाते. यामुळे प्रदूषणाचा स्तरही वाढला आहे. विशेष म्हणजे शहराच्या ‘शुद्ध हवा नियोजनात’ ‘डेडिकेटेड सायकल ट्रॅक’चा समावेश आहे. महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मनपाच्या कृती समितीला तो मूर्तरूपात आणायचा आहे. मात्र त्यांच्याकडून ते होणार याबाबत शंका आहे पण नागरिकांनी ठरवले आणि मागणी केली तरच ते शक्य होऊ शकेल. मात्र ‘सायकल केंद्रित’ जीवनशैलीसाठी लोकांनी आग्रही असले पाहिजे, हे महत्वाचे आहे.

वातावरणातील प्रदूषण काढणे शक्य नाही. पावसाने ते जमिनीवर बसेल पण त्यातून माती व जलप्रदूषण होईल. मात्र गाड्यांचा वापर कमी करून प्रदूषण उत्सर्जन कमी करणे आपल्या हाती आहे. त्यासाठी कमी अंतरासाठी सायकलीचा उपयोग हा सर्वोत्तम पर्याय आहे. यातून प्रदूषण कमी करण्यास मदत होईल व आरोग्यही सुदृढ राहील.
- राहुल सावंत, वातावरण फाउंडेशन

 

 

Web Title: Citizens should adopt a 'cycle' centered lifestyle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.