लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : पाळण्यावर खेळत असताना अचानक दाेरीने बालकाला गळफास लागला. यात त्याचा करूण अंत झाला. ही दुर्दैवी घटना काेंढाळी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील मासाेद येथे मंगळवारी (दि.९) दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. पीयूष पुष्पराज धारपुरे (११, रा. मासाेद, ता. काटाेल) असे मृत बालकाचे नाव आहे. महिनाभरापूर्वी दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाल्याने पीयूषचे वडील पुष्पराज धारपुरे हे घरी विश्रांतीवर आहेत. तर पीयूषची आई माहेरी गेली हाेती. दरम्यान मंगळवारी दुपारच्या सुमारास पीयूष हा घरातील पाळण्यावर खेळत असताना पाळण्याच्या दाेरीने गळफास लागून पीयूषचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पीयूषच्या आईने आपल्या भावासह मासाेद गाठले. पीयूषच्या मृत्यूला त्याचे वडील जबाबदार असल्याचे सांगून पीयूषच्या मामाने वाद घातला व पुष्पराज धारपुरे यांना मारहाण केली. दरम्यान, बुधवारी दुपारच्या सुमारास पीयूषच्या मामाने पाेलीस ठाणे गाठत घटनेची तक्रार नाेंदवली. तक्रारीनुसार पीयूषच्या मामाने त्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार विश्वास फुल्लरवार करीत आहेत.