शिबिरासाठी प्रसासन सज्ज : विविध विभागांचे १५ स्टॉल राहणार नागपूर : दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघासाठी शासकीय आयटीआय समोरील मुंडले हायस्कूल येथे ३० मे रोजी होणाऱ्या समाधान शिबिराची तयारी पूर्ण झाली आहे. या शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल. याप्रसंगी केद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. महापौर प्रवीण दटके, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नगरसेवक संदीप जोशी, नगरसेवक गिरीश देशमुख यांनी शुक्रवारी सायंकाळी समाधान शिबिराच्या व्यवस्थेची पाहणी केली. समाधान शिबिरात समाजकल्याण विभाग, आदिवासी विभागासह विविध खात्यासाठी १५ स्टॉल उभारण्यात आले आहे. या स्टॉलमध्ये सकाळी ९ वाजेपासून अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील. सकाळी १० वाजेपासून नागरिकांच्या कामांचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. या समाधान शिबिरात मुख्यमंत्री स्वत: सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत उपस्थित राहतील व जनतेच्या अर्जांची सुनावणी घेतील. शिबिर दुपारी ४ वाजेपर्यंत चालेल. (प्रतिनिधी)महापालिका-नासुप्रशी संबधित सर्वाधिक अर्ज या शिबिरासाठी एकूण ४६२ जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यात सर्वाधिक १४१ अर्ज महापालिकेशी संबंधित आहे. त्यानंतर नागपूर सुधार प्रन्यासशी संबधित ११९, जिल्हाधिकारी कार्यालय ४८, भूमी अभिलेख ३८, म्हाडा २४, आरोग्य विभाग १७, एमएसईबी व स्पॅन्कोशी संबंधित १५ अशा ठळक तक्रारी आहेत. याशिवाय कोषागार, आरटीओ, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, कामगार कल्याण, सामाजिक न्याय, विद्यापीठ, रेल्वे, उद्योग आणि वजन व मापे विभागांशी संबधित तक्रारी आहेत.
मुख्यमंत्री करणार मतदारांचे समाधान
By admin | Updated: May 30, 2015 02:52 IST