ट्रॅव्हल्स व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल : विमानाचे बोगस तिकीट सोपवले नागपूर : हज यात्रेच्या नावावर फसवणूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स व्यापाऱ्याने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आपले कृत्य लपविण्यासाठी ट्रॅव्हल्स व्यापाऱ्याने पीडित व्यक्तीला खासगी विमानाचे बोगस तिकीट सुद्धा दिले. यानंतर त्याची बनवेगिरी उघडकीस आली. गणेशपेठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.फैजी मोईन खान (४३) रा. बेलदारनगर नरसाळा असे आरोपीचे नाव आहे. फैजी याचे अग्रसेन चौकातील अमन बिल्डिंगमध्ये अरहम टूर्स आहे. नागरिकांना हज यात्रेवर नेण्यासाठी ते यात्रा आयोजित करतात. अब्दुल जलील शेख (५५) प्रेमनगर कोराडी हे फैजीच्या संपर्कात आले. शेख यांना पत्नी आणि सासूसोबत हज यात्रेला जायचे होते. त्यांनी फैजीशी संपर्क साधला. फैेजीने हज यात्रेची व्यवस्था करण्यासाठी शेख यांच्याकडून २३ मार्च २०१५ रोजी १ लाख ६० हजार रुपये घेतले. नियोजित कालावधी उलटूनही हज यात्रेची व्यवस्था न झाल्याने शेख चिंतेत पडले. ते हज यात्रेसाठी तगादा लावू लागले. तेव्हा फैजीने त्यांना ८० हजार रुपये परत केले. इतर पैसे लवकरच परत देण्याचे आश्वासन दिले. यानंतर फैजीने शेख यांच्याकडून हज यात्रेची व्यवस्था करण्याच्या नावावर पुन्हा ७० हजार रुपये घेतले. त्यानंतरही हज यात्रेची व्यवस्था झाली नाही. शेख यांनी पुन्हा तगादा लावण्यास सुरुवात केली. तेव्हा फैजीने त्यांना एका खासगी विमान कंपनीचे तिकीट सोपविले. हज यात्रेच्या तिकिटासंबंधी शेख यांना माहिती असल्याने त्यांना संशय आला. त्यांनी विमान कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधला तेव्हा ते तिकीट बोगस असल्याचे आढळून आले. शेख यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)अनेकांना फसविले फैजीने हज यात्रेच्या नावावर अनेक भाविकांनाही फसविल्याचा संशय आहे. धार्मिक यात्रेशी संबंधित प्रकरण असल्याने पीडित तक्रार करण्यास मागे पुढे पाहत आहेत. या घटनेपासून फैजी फरार आहे.
हज यात्रेच्या नावावर फसवणूक
By admin | Updated: November 12, 2016 02:57 IST