रामटेक : चाेरट्याने रामटेक शहरातील बायपास राेडलगत असलेल्या मायापुरी मंदिरात चाेरी केली. यात त्याने माेटरपंप, पाईप व तर साहित्य चाेरून नेले. ही घटना साेमवारी (दि. २४) सकाळी उघडकीस आली.
रामटेक शहरालगत असलेल्या बायपास राेडवर बारई समाजाच्या मथुरासागर पान संस्थेच्या मालकीचे मायापुरी मंदिर आहे. लाॅकडाऊनमुळे ते मंदिर काही दिवसापासून बंद आहे. शिवाय, काही दिवसापासून या मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे मंदिराच्या खाेलीत काही साहित्य ठेवले हाेते. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास मंदिर परिसरात कुणीही नसताना चाेरट्याने त्या खाेलीत प्रवेश केला आणि तेथील इलेक्ट्रिक माेटरपंप, ४० फूट लांब पाईप व इतर बांधकाम साहित्य चाेरून नेले. ही बाब साेमवारी सकाळी उघड हाेताच मथुरासागर पान संस्थेचे व्यवस्थापक उदय भाेगे यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. चाेरीला गेलेल्या साहित्याची एकूण किंमत १० हजार रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.