योगेंद्र शंभरकर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील नाईक तलावानजीकच्या परिसराला अनेक वर्षांपासून बांगलादेश वस्तीच्या नावाने ओळखण्यात येते. परंतु आता स्थानिक नागरिक भारताचे बांगलादेशाविषयी बदलते धोरण पाहून आपल्या वस्तीचे नाव नाईकवाडी करावे, अशी मागणी करत आहेत. बांगलादेश नावामुळे बाहेरील नागरिक या परिसरात वास्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांचा परिसर आपली मूळ ओळख विसरत चालला आहे. २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मध्य नागपूरच्या एक स्वयंसेवी संस्था 'अॅक्शन कमिटी'ने पहिल्यांदा यावर आक्षेप नोंदवून परिसरात बॅनर, पोस्टर लावले.
आता स्थानिक नागरिकही त्यांच्या वस्तीचे नाव बांगलादेश ऐवजी नाईकवाडी करावे, ही मागणी करत आहेत. आपल्या परिसराचे नाव नाईकवाडी करावे यासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी बॅनर लावण्यासोबतच बैठकांचे आयोजन सुरू केले आहे. वस्तीचे नाव बदलण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य शासनाला निवेदन देण्याची तयारीसुद्धा केली आहे.
सैन्य भरतीतूनही डावलले गेले स्थानिक नागरिक सी. रेड्डी यांनी सांगितले की, ते ४० वर्षांपासून या वस्तीत राहत आहेत. तरुण असताना ते सैन्याच्या भरती प्रक्रियेत सहभागी झाले. त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्यांना पत्ता विचारला असता त्यांनी नाईक तलाव, बांगलादेश असा पत्ता सांगितला. परंतु बांगलादेश नाव सांगितल्यामुळे त्यांना नोकरी मिळाली नव्हती.
तलावात अतिक्रमण हे नाव देताना भविष्यात येथे बाहेरील नागरिक येऊन वास्तव्य करतील, हे त्यांना माहीत नव्हते. येथील तलावात बाहेरील व्यक्ती माती टाकून त्यावर अतिक्रमण करत असून ते या भागातील जलस्रोत नष्ट करत आहेत.
"भारताच्या मदतीने वसलेल्या बांगलादेशाची भूमिका भारताप्रति बदलत आहे. तेथील नागरिक भारतात घुसून देशाला नुकसान पोहोचवीत आहेत. अशा देशाचे आमच्या वस्तीला नाव देणे सहन होणारे नाही. त्यामुळे शासनाने या वस्तीचे नाव त्वरित बदलावे, अन्यथा नागरिकांना घेऊन रस्त्यावर आंदोलन करण्यात येईल."- सचिन बिसेन, सचिव, अॅक्शन कमिटी