‘चंद्रयान-३’ चे यश ‘लाईफटाईम अचिव्हमेंट’; इस्राेच्या माधवी ठाकरे यांनी कथन केला रोमांचक अनुभव

By निशांत वानखेडे | Published: December 9, 2023 07:10 PM2023-12-09T19:10:22+5:302023-12-09T19:11:45+5:30

नागपूरला आलेल्या डाॅ. माधवी ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

chandrayaan 3 success lifetime achievement an exciting experience narrated by isro madhavi thackeray | ‘चंद्रयान-३’ चे यश ‘लाईफटाईम अचिव्हमेंट’; इस्राेच्या माधवी ठाकरे यांनी कथन केला रोमांचक अनुभव

‘चंद्रयान-३’ चे यश ‘लाईफटाईम अचिव्हमेंट’; इस्राेच्या माधवी ठाकरे यांनी कथन केला रोमांचक अनुभव

निशांत वानखेडे, नागपूर : ‘चंद्रयान-२’ चे अपयश हा खूप मोठा धक्का होता, पण त्यातून सावरत ‘चंद्रयान-३’ची तयारी सुरू केली. सर्व प्रकारच्या चाचण्या यशस्वी झाल्यामुळे ही मोहीम यशस्वी होण्याची सर्वांनाच खात्री होती. २३ जुलै राेजी चंद्रावर यशस्वी लँडींग झाले आणि एकच जल्लोष झाला. ‘भारत माता की जय’चा जयघाेष आसमंतात पाेहचला. हा क्षण खराेखरच ‘लाइफटाईम अचिव्हमेंट’ सारखाच आहे, अशी भावना मूळ नागपूरच्या व सध्या अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे कार्यरत वैज्ञानिक डॉ. माधवी ठाकरे यांनी व्यक्त केल्या.

महिला समन्वय आणि संघमित्रा सेवा प्रतिष्ठानच्यावतीने रविवार, १० डिसेंबर रोजी रेशिमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात नेत्री संमेलनात सहभागी हाेण्यासाठी नागपूरला आलेल्या डाॅ. माधवी ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘चांद्रयान-३’ ला चंद्रावर ठरलेल्या ठिकाणी लँडिंग करण्यासाठी यानाला जे चार रिमोट सेन्सींग कॅमेरे लावण्यात आले होते, ते डॉ. माधवी ठाकरे यांच्या चमूने तयार केले होते, हे विशेष. माधवी ठाकरे यांचा जन्म मूर्तिजापूर येथे झाला असून अकोला येथून बीएससी, अमरावती विद्यापीठातून एमएससी आणि पुणे विद्यापीठातून त्यांनी मटेरियल सायन्समध्ये पीएचडी पूर्ण केली आहे. त्याकाळी इस्रोच्या लोगोचे प्रचंड आकर्षण होते. २००९ साली जेव्हा इस्रोकडून सायंटिफीक इंजिनीयर म्हणून ऑफर लेटर आले त्यावेळी आनंद गगनात मावेनासा झाला होता, असे त्या म्हणाल्या.

इस्राेतर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक माेहीम आमच्यासाठी खास असते. अपयश आले की निश्चितच निराशा हाेते पण ताे शेवट नसताे. चंद्रयान-३ च्या माेहिमेच्या वेळी दुसऱ्या माेहिमेच्या अपयशाचा पूर्ण अभ्यास करण्यात आला हाेता. त्यातूनच यशाचा मार्ग सुकर झाला. या यशात पती व मुलीचा महत्वाचा वाटा असे सांगताना, कुटुंबाचे पाठबळ असल्याशिवाय महिलांना यश मिळणे कठीण असते, अशी भावना डाॅ. ठाकरे यांनी व्यक्त केली.

Web Title: chandrayaan 3 success lifetime achievement an exciting experience narrated by isro madhavi thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.