मध्य रेल्वेकडून महिनाभरात २४ लेवल क्रॉसिंग (एलसी) फाटक बंद
By नरेश डोंगरे | Published: November 11, 2023 04:31 PM2023-11-11T16:31:24+5:302023-11-11T16:32:27+5:30
गेटवर ताटकळण्याच्या त्रासातून मुक्तता : ट्रॅफिक जामची समस्याही लागली मार्गी
नागपूर : विविध शहरातील नागरिकांना वारंवार ताटकळत ठेवणाऱ्या रेल्वेच्या २४ लेवल क्रॉसिंग गेटच्या ठिकाणी ओव्हर तसेच अंडर ब्रीज बांधण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय आणि ट्रॅफिक जामची समस्याही मार्गी लागली आहे. ऑक्टोबर महिन्यात हे सर्व क्रॉसिंग गेट बंद करण्यात आले आहे.
शहराच्या मधातून रेल्वे लाईन गेल्यामुळे विविध शहरात रेल्वेकडून क्रॉसिंग फाटक बांधण्यात आले होते. अलिकडे शहरा-शहरात वाहनांची संख्या मोठी वाढल्याने या क्रॉसिंग गेटचा नागरिकांना मोठा त्रास होत होता. दिवसभरात अनेकदा वेगवेगळ्या रेल्वे गाड्या त्या लाईनवरून धावत असल्याने गाडी जाण्याच्या काही मिनिटांपूर्वी हे रेल्वे गेट बंद करण्यात येत होते. त्यामुळे त्या मार्गाने जाणाऱ्या दोन्ही बाजुच्या नागरिकांना वारंवार ताटकळत उभे राहावे लागत होते. ही समस्या मार्गी लावण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे समांतर फाटकाच्या बाजुला उड्डाण पुल किंवा भुयारी मार्ग बांधून ते गेट बंद करण्याचे आणि नागरिकांचा त्रास कमी करण्यासंबंधीची मागणी ठिकठिकाणच्या लोकप्रतिनिधींकडून, नागरिकांकडून करण्यात येत होती. अखेर त्याची दखल घेऊन मध्य रेल्वेच्या चार विभागातील २४ फाटकाजवळ उड्डाण पुल किंवा भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले. गेल्या महिन्यात ते पूर्ण झाल्याने अखेर हे सर्व फाटकं बंद करून उड्डाण तसेच भुयारी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे नागरिकांचा त्रास कमी झाला आहे.
विभागनिहाय फाटकांची माहिती
बंद करण्यात आलेल्या मध्य रेल्वेच्या २४ रेल्वे फाटकांपैकी सर्वाधिक ७ फाटके भुसावळ विभागातील आहेत. तर नागपूर आणि पुणे विभागातील प्रत्येकी ६ तसेच आणि मुंबई विभागातील ५ रेल्वे फाटकांचा समावेश आहे.