सुनील कुमार सूद यांची माहिती : ११ नव्या लाईन, ७ सर्वेक्षणाची घोषणानागपूर : रेल्वे अर्थसंकल्पात मध्य रेल्वेच्या विकासकामांना गती मिळून जवळपास ५ हजार कोटी रुपये मिळाल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी पत्रकार परिषदेत दिली. याशिवाय ३० हजार कोटी रुपयांच्या ११ नव्या रेल्वेलाईनला मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मंजुरी मिळालेल्या रेल्वे लाईनसाठी सात सर्वेक्षण मंजूर करण्यात आले आहेत. ‘डीआरएम’ कार्यालयाच्या सभागृहातील पत्रकार परिषदेत सूद म्हणाले, रेल्वेने ‘क्लिन माय कोच’ सर्व्हिससाठी एक मोबाईल अॅप तयार केले आहे. याद्वारे एसएमएसच्या माध्यमातून स्वच्छतेविषयीच्या सर्व तक्रारींचे निवारण करण्यात येणार असून हे अॅप देशभरात लागू करण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोर्डाचे पुनर्गठन करणे, आरडीएसओच्या समांतर एक दीर्घकालीन संस्था बनविण्याची सूचना केली आहे. ते म्हणाले, अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या नागपूर-अमृतसर एसी प्रीमियमसाठी कोच उपलब्ध नाहीत. रेल्वे कोच फॅक्ट्रीमध्ये सात हजार कोच तयार होत आहेत. यातील चार हजार कोच जुन्या कोचच्या ठिकाणी लावून उर्वरीत कोचमधून नव्या रेल्वेगाड्या सुरु होतील. अजनीत मॅकेनाईज्ड लॉंड्री साकारण्यासाठी विलंब झाल्याची कबुली देऊन नागपूर स्थानकावर नॅरोगेजच्या जागी ब्रॉडगेज प्लॅटफार्म तयार करण्यात येत आहे.प्लॅटफार्मच्या एका वाकड्या टोकाला सरळ करण्यात येईल. विभागात ७० रेल्वेस्थानकांवर १२५ फूट ओव्हरब्रीज आहेत. तरीसुद्धा प्रवासी रुळ ओलांडून जातात. यामुळे १२५ नवे फूट ओव्हरब्रीज तयार करण्याची परवानगी मागितली असून त्याची रुंदी ८ फूट राहणार आहे. होम प्लॅटफार्मवरून धावतील इतर रेल्वेगाड्या‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांनी सांगितले की, नागपूर-कळमना डबलिंगच्या कामासाठी निधी मिळाला आहे. हे काम पूर्ण होताच होम प्लॅटफार्मवरून इतर रेल्वेगाड्या चालविण्यात येतील. सध्या रेल्वेस्थानकावर विकासकामे सुरू आहेत. नागपूर-सेवाग्राम, इटारसी-नागपूर, सेवाग्राम-बल्लारशा थर्डलाईनचे काम सुरू आहे. गोधनी-कळमना डबलिंगचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. आता या मार्गावर २० ऐवजी ५० रेल्वेगाड्या धावतील. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात २०१६ मध्ये मानवरहित रेल्वेगेट बंद करण्यात येत असून त्यासाठी भरपूर निधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.दपूम रेल्वेचे ‘डीआरएम’ आलोक कंसल यांनी ८७२ कोटी रुपये मिळाल्याचे सांगितले. यामुळे पायाभूत सुविधा पूर्ण होऊन काम झपाट्याने पूर्ण केल्यास आॅगस्ट, आॅक्टोबर आणि जानेवारी महिन्यात आणखी निधी मिळू शकतो. इतवारी स्थानकावर कोचिंग कॉम्प्लेक्स आणि इतर कामासाठी पाठविलेल्या २४ कोटीच्या कामाला मंजुरी मिळाली नाही. अर्थसंकल्पात नागपूर-नागभीड ब्रॉडगेजसाठी २५ कोटी, नागपूर-राजनांदगाव थर्ड लाईनसाठी १५७ कोटी, नागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेजसाठी १५० कोटी मिळाले आहेत. नागपूर-कळमना डबलिंगसाठी १० कोटी मिळाले आहेत. मोतीबागमध्ये ११४ कोचपैकी ५६ कोचमध्ये बायो टॉयलेट लावण्यात आले असून उर्वरीत ७२ कोचमध्ये पुढील २ महिन्यात लावण्यात येतील. मोतीबाग वर्कशॉपमध्ये २ हजार ५०० बायो टॉयलेट तयार करण्यात येत असून दर महिन्याला १०० बायो टॉयलेट तयार होत आहेत. एका बायो टॉयलेटची किंमत २ लाख रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मध्य रेल्वेला मिळाले पाच हजार कोटी
By admin | Updated: February 26, 2016 03:00 IST