लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : अलीकडच्या काळात विना राॅयल्टी रेतीची वाहतूक प्रचंड वाढली आहे. वाडी पाेलिसांनी लाव्हा येथील टी पाॅईटजवळ केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रक पकडला. यात ट्रकचालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण ४ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. ७) सायंकाळी करण्यात आली.
शेख मेहबूब शेख खलील, रा. काटोल असे अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. वाडी परिसरातून रेतीची वाहतूक केली जात असल्याचे कळताच पाेलिसांनी वाडी नजीकच्या लाव्हा टी पाॅईंटजवळ नाकाबंदी करून जड वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. यात पाेलिसांनी एमएच-४०/एके-७२८४ क्रमांकाचा ट्रक थांबवून झडती घेतली. त्या ट्रकमध्ये रेती असल्याचे निदर्शनास येताच पाेलिसांनी कागदपत्रांची तपासणी केली. त्यात ती रेतीची विना राॅयल्टी वाहतूक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पाेलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेत अटक केली.
त्याच्याकडून चार लाख रुपयांचा ट्रक आणि २० हजार रुपये किमतीची रेती असा एकूण ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पाेलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली. या रेतीची वाहतूक मिठाभाई डुडा, रा. काटाेल नाका, गिट्टीखदान नागपूर, याच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचे ट्रकचालक शेख मेहबूब शेख खलील याने सांगितल्याने त्याच्या विराेधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी भादंवि ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक जायभाये करीत आहेत.