लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांच्या आकड्यात फेरफार करण्याचा आरोप करणारे 'सीएसडीएस'चे संजय कुमार आणखी अडचणीत सापडले आहेत. त्यांनी त्यांच्या सोशल माध्यमांवरील पोस्ट हटवून चुकीचा टेडा जगासमोर मांडल्याबाबत माफी मागितली. परंतु, रामटेकच्या तहसीलदारांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार रामटेक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता या मुद्द्यावरील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
सीएसडीएसने सोशल माध्यमांवर महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावा करत रामटेकचे उदाहरण दिले होते. रामटेकमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान कमी करण्यात आल्याचा दावा सीएसडीएसकडून करण्यात आला होता. या प्रकरणात दोन दिवसाअगोदर संजय कुमार यांनी चुकीचा डेटा पोस्ट केल्याबाबत माफी मागत संबंधित पोस्ट डिलीट करण्यात आली. मात्र, त्यांची पोस्ट चुकीची असल्याचे त्यांनीच मान्य केल्यावर रामटेकच्या तहसीलदारांनी त्यांच्याविरोधात समाजात दिशाभूल करणारी माहिती पोहोचविणे आणि संभ्रम निर्माण करण्यासंदर्भात तक्रार केली. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संजय कुमार यांच्याविरोधात बीएनएसचे कलम १७५ (निवडणुकीसंदर्भात खोटे विधान), कलम ३५३ (१) ब (सार्वजनिक गैरप्रकार घडवून आणणारी विधाने), कलम २१२ (सार्वजनिक सेवकाला खोटी माहिती देणे) आणि कलम ३४० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी याला दुजोरा दिला आहे.