नागपूर : ओबेदुल्लागंज महामार्गावर काेराडी मंदिर प्रवेशद्वारासमाेर निर्माणाधीन उड्डाणपुलाचे काम संथगतीने चालले आहे. त्यामुळे महादुलापासून वाहतुकीचा जाम लागलेला असताे. वाहनचालकांना असुविधांचा सामना करावा लागताे. अशाने भरमसाट महागलेले पेट्राेल, डिझेल व्यर्थ जाळले जात असल्याने वाहनचालकांचा मनस्ताप हाेताे.
२०१६ मध्ये भूमिपूजनानंतर काेराडी मंदिर परिसराला लागलेल्या या उड्डाणपुलाच्या डिझाईनमध्ये काही बदल करण्यात आले. डिझाईन झाल्यानंतर काम सुरू झाल्यावर पुलाखाली अंडरपास बनविण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये एक नाही तर दाेन अंडरपास असावे, अशी मागणी पुढे आली. मागील सहा महिन्यात सर्व्हिस राेड डांबराचे न करता सिमेंटचे बनविण्याचा प्रस्ताव समाेर आला. फूटपाथवर पेव्हर ब्लाॅक करण्यासह गार्डन तयार करण्याचाही प्रस्ताव तयार करण्यात आला. वारंवार सूचना येत गेल्याने काम रखडत गेले. उल्लेखनीय म्हणजे दीड वर्षापूर्वी या पुलाचा खर्च ३२ काेटी आकारला हाेता, जाे आता नवनव्या प्रस्तावामुळे आणखी वाढण्याची शक्यता आहे.
९०० मीटरच्या उड्डानपुलाचे बांधकाम नवनवीन सूचनांमुळे रखडत चालले आहे. त्यामुळे अभियंत्यांनी त्वरीत काही ठाेस निर्णय घेऊन बांधकामाची गती वाढवावी लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. हा मार्ग नागपूरहून छिंदवाडा, बैतूल, भाेपाल व इटारसीकडे जाणाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. काम संथगतीने चालल्याने महादुल्याहून मार्ग काढरयला उशीर लागत असून मनस्ताप हाेत आहे. शिवाय सर्व्हिस राेडला लागून असलेल्या दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतुकीचा खाेळंबा हाेत असून अपघाताचाही धाेका वाढला आहे.