लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : तालुक्यात काेराेनाची दुसरी लाट आता ओसरत असून, स्थिती नियंत्रणात आहे. दैनिक रुग्णसंख्येत घट आली असून, रुग्ण काेराेनामुक्त हाेण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी गाफील राहू नका, पुढील काही दिवस काळजी घ्या, मास्क वापरा व फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करा, असे आवाहन तालुका आराेग्य विभागाने केले आहे.
तालुक्यात आतापर्यंत २,६३६ काेराेनाबाधित रुग्ण आढळले. यात शहरात ५३०, तर ग्रामीणमधील १,९४० रुग्णांसह तालुक्याबाहेरील १६६ रुग्णांचा समावेश आहे. यापैकी २,२८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर कोरोनामुळे ७९ जणांचा मृत्यू झाला. सध्या १७२ ॲक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. यात कोविड केअर सेंटरमध्ये नऊ, तर गृहविलगीकरणात १६३ रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यात कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले. मात्र, संक्रमणाची ही दुसरी लाट ओसरत असतानाच काही जण बेफिकीर होऊन बिनधास्तपणे फिरत आहेत. व्यापार व बाजारपेठांतील दुकानाचे शटर अर्धे उघडून काहींकडून काेराेनाला निमंत्रण दिले जात आहे. कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस प्रत्येकाने काळजी घेतलीच पाहिजे. मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करा, फिजिकल डिस्टन्सिंग पाळा, असे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे.
....
जून महिन्यात ‘बॅण्ड बाजा बारात’
मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी लग्नसराईच्या दिवसांत काेराेनाची दुसरी लाट आली. त्यामुळे अनेकांचे लग्न सोहळे थांबले आहेत. आता मे महिन्यात दुसरी लाट ओसरू लागली आहे. शिवाय, लाॅकडाऊन ३१ मे राेजी संपत आहे. लाॅकडाऊन संपताच जून महिन्यात अनेक जण ‘शुभमंगल सावधान’ करण्याच्या तयारीत आहेत. लग्न, नामकरण, बारसे व राजकीय कार्यक्रमांतील गर्दीमुळेच दुसरी लाट भयावह ठरली. त्यामुळे लॉकडाऊन संपले आणि संसर्ग ओसरला तरी प्रशासनाने अशा कार्यक्रमांना तूर्तास परवानगी देऊ नये; अथवा कठाेर नियमावलीच्या अधीन राहूनच परवानगी द्यावी, असा सूर नागरिकांत व्यक्त हाेत आहे.