लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाडीतील एका तरुणाने आपल्या तीन मित्रांना आत्महत्या करायला जात असल्याचे फोनवरून सांगितले अन् काही वेळेनंतर दुचाकीसह फुटाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. अथर्व राजू आनंदेवार (१९) असे मृताचे नाव आहे. सोमवारी दुपारी १२.३०च्या सुमारास ही थरारक घटना घडली.
अथर्वने फोनवरून आत्महत्या करीत असल्याचे सांगताच त्याच्या मित्रांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. दोनजण धावत-पळत फुटाळ्यावर पोहोचले. मात्र, वेळ झाली होती. अथर्व पाण्यात गटांगळ्या खात होता. त्याला वाचविण्यासाठी मित्रांनी त्याच्या दिशेने तलावाच्या काठावरचे बांबू, बल्ली पाण्यात फेकले. आरडाओरड करून मदतही मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तातडीने मदत न मिळाल्याने मित्रांच्या डोळ्यांदेखतच तो पाण्यात बुडाला. अथर्व त्याच्या मित्रांसोबत रविवारी सावनेरजवळच्या वॉटर पार्कला फिरायला गेला होता. तेथे त्याने मित्रांसोबत माैजमजाही केली. सायंकाळपर्यंत तो एकदम नॉर्मल होता. त्याच्या आत्महत्येचे कारण समजले नाही. दरम्यान, अथर्वच्या आत्मघाती पावलामुळे त्याच्या कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे. त्याच्या आईची प्रकृती बिघडली असून, तो राहत होता त्या आंबेडकरनगरातही शोककळा पसरली आहे.
----