नागपूर : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नागपूरसह दूरवरून उपचारासाठी रुग्ण येतात. परंतु अव्यवस्थेमुळे या रुग्णांना त्रास होत आहे. शनिवारी अशीच एक घटना समोर आली. रुग्णालयात गर्भवती महिलांना सोनोग्राफीसाठी तारीख देऊन बोलविण्यात येते. परंतु मशीन बंद आहे तसेच इतर अव्यवस्थेमुळे त्यांना परत पाठविण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. महिलांनी आपला त्रास सांगितल्यास हे शासकीय रुग्णालय आहे येथे असेच होते. तुम्ही दुसरीकडे उपचार करा असा सल्ला त्यांना देण्यात येतो. रुग्णालयाच्या या व्यवहारामुळे गर्भवती महिलांना त्रास होत असल्याची स्थिती आहे.
शनिवारी दोन गर्भवती महिला उमरेड आणि कोंढाळी येथून आल्या होत्या. त्या युवक कॉंग्रेसच्या भोजन वितरणाच्या स्टॉलवर पोहोचल्या. महिलांनी रडत-रडत आपली आपबिती युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना सांगितली. त्यांच्या मते त्या सकाळी ५ वाजता सोनोग्राफीसाठी मेडिकलमध्ये पोहोचतात. परंतु तारीख देऊन बोलावल्यानंतरही त्यांना पुन्हा पुढील तारीख देऊन परत पाठविण्यात येते. मागील दोन महिन्यांपासून त्यांना हा त्रास होत आहे. रुग्णालयात अव्यवस्थेमुळे भटकंती करीत असलेल्या गर्भवती महिलांच्या समस्या ऐकून युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके हे आपल्या कार्यकर्त्यांसह अधिष्ठाता कार्यालयात पोहोचले. त्यांनी महिलांना होत असलेला त्रास सांगून जोरदार हंगामा केला. त्यानंतर पोलीस तेथे पोहोचले. हंगामा केल्यानंतर अधिष्ठातांनी सोनोग्राफी मशीन चांगली झाल्याचे सांगितले. आता महिलांना सोनोग्राफीसाठी वाट पाहावी लागणार नसल्याची हमी दिली. त्यामुळे त्रस्त झालेल्या गर्भवती महिलांना दिलासा मिळाला. वॉर्डाजवळ पोहोचल्यानंतर आपणास थांबवून अनेक महिलांनी आपल्या समस्या सांगितल्या असून मेडिकलमध्ये अव्यवस्था असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे बंटी शेळके यांनी सांगितले. यावेळी आकाश गुजर, तौसिफ खान, स्वप्निल बावनकर, हेमंत कातुरे उपस्थित होते.
............