नागपूर विभाग : पावसाचा परिणामनागपूर : पावसाळ्याच्या अंतिम टप्प्यात बरसणाऱ्या पावसामुळे सिंचन प्रकल्पांच्या जलपातळीत चांगलीच वाढ झाली असून, नागपूर विभागातील बहुतांश मोठे प्रकल्प काठोकाठ म्हणजे ८० टक्के भरले आहेत.राज्यात एकूण ८४ मोठे प्रकल्प आहेत. त्यात नागपूर विभागात १६ आहेत. त्यापैकी नागपूर जिल्ह्यातील पाच प्रकल्पांचा समावेश आहे. विभागातील प्रकल्प ८१ टक्के भरले आहेत. जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्प ८१ टक्के, पेंच प्रकल्प ७५ टक्के, निम्न वेणा (नांद) ९२ टक्के, वडगाव ९६ टक्के भरला आहे.नागपूर विभागात ४० मध्यम प्रकल्प असून, त्यातील जलसाठा हा ७९ टक्के आहे. तर जिल्ह्यातील ३६६ लघु प्रकल्पांत सध्या ६५ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी म्हणजे २०१३ मध्ये याच काळात अनुक्रमे या प्रकल्पांमध्ये (मोठे, मध्यम आणि लघु) ९१ टक्के, ९८ टक्के आणि ९२ टक्के जलसाठा होता.सध्या पावसाचे परतीचे दिवस सुरू आहेत. मात्र या काळात पूर्व विदर्भात पावसाचा जोर आहे. नागपूर शहरातही त्याची कधी रिपरिप तर कधी जोरदार हजेरी अनुभवायला मिळत आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. गतवर्षीही आॅगस्ट महिन्यात पूर्व विदर्भात अतिवृष्टी आली होती. यंदा पावसाला उशीर झाला. त्याने वेळापत्रक चुकविले. मात्र टप्प्याटप्प्याने तो बरसला व त्यामुळे तूट भरून निघाली. पण शेतीला गरज होती तेव्हा पाठ फिरविल्याने पिकांना फटका बसला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला. (प्रतिनिधी)
धरणे भरली काठोकाठ
By admin | Updated: September 12, 2014 00:49 IST