जलालखेडा : नरखेड तालुक्यातील खरबडी येथील जाम नदीवर ९२ लाख रुपये खर्च करून कोल्हापुरी बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली होती. याच बंधाऱ्यावर पूल बांधण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली होती. या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला. या पुलाच्या निर्मितीसाठी १ कोटी ३० लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी शुक्रवारी दिली.
खरबडी येथील जाम नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला होता. यावर एक छोटासा पूलही होता. परंतु तो लहान होत असल्याने तो वाढविण्याची मागणी सातत्याने होत होती. मधल्या काळात ही मागणी मागे पडली होती. खरबडी येथील जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांची शेती ही जाम नदीच्या पलीकडे आहे. यामुळे हा पूल होणे अत्यंत आवश्यक होते. या संदर्भात मुंबई येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बंडोपंत उमरकर, जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.