विश्वबंधूत्व दिन : अरविंद खांडेकर यांचे आवाहन नागपूर : धर्माबद्दल असलेला अहंकारामुळेच आज जगात अशांततेचे वातावरण पसरले आहे. देशातच नव्हे तर जगात शांतता निर्माण करायची असेल तर धर्माच्या भिंती तोडून सेतू बांधण्याची गरज आहे, असे आवाहन माजी प्राचार्य अरविंद खांडेकर यांनी केले. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा नागपूरतर्फे विश्वबंधुत्व दिनानिमित्त गुरुवारी साई सभागृह येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी खांडेकर हे मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक विलास काळे होते तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी पदाधिकारी विजय सवनकर हे मुख्य अतिथी होते. ‘विश्वबंधुत्वाचा आधार-परिवार’ या विषयावर बोलताना अरविंद खांडेकर म्हणाले, विश्वबंधुत्वचा आधारा हा मुळातच कुटुंब हाच आहे. संस्कार हे कुटुंबातूनेच मिळत असतात. संस्कारक्षम अशी आपली भारतीय संस्कृती होती. परंतु आजच्या उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबव्यवस्थेमुळे ही संस्कृती धोक्यात आली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जगाने कितीही प्रगती केली असली तरी स्नेह व प्रेम हे विकत घेता येत नाही. ते कुटुंबातूनच मिळत असते. दीप प्रज्वलन करून कुठल्याही कामाची सुरुवात करण्याची आपली परंपरा होती. परंतु सध्या दिवा विझवून वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे, असा चिमटा सुद्धा त्यांनी यावेळी काढला. कोणताही धर्म श्रेष्ठ नाही, सर्वच धर्म श्रेष्ठ आहेत, असा संदेश दिला. माझे बंधू आणि भगिनींनो असे संबोधून भारतीय संस्कृतीचे जगाला दर्शन घडवून दिले, असेही त्यांनी स्पष्ट केले. विलास काळे यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांमुळे आपल्या जीवनात आमूलाग्र बदल झाला असून आज आपण आनंदाने व समाधानाने जगत असल्याचा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी दहावी व बारावीच्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मानसी व वैदेही यांनी गीत सादर केले. गीताताई केळकर यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी विषद केली. मंगेश गिरी यांनी प्रास्ताविक केले. अर्चना लपालकर यांनी संचालन केले. विवेकानंद केंद्राच्या नगरप्रमुख गौरीताई खेर यांनी आभार मानले. तर वेदवती खेर यांनी सादर केलेल्या वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)
धर्माच्या भिंती तोडा, सेतू बांधा
By admin | Updated: September 12, 2014 00:48 IST