लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशातील विविध प्रांतात चंदनतस्करी आणि मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. शेर मोहम्मद रशीद ( वय ५८, रा. देवीनगर, सिरमोर, हिमाचल प्रदेश) आणि नूर हसन कालू (वय ४०, रा. आजाद कॉलनी, डेहराडून) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रायपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट तीनने ही कामगिरी बजावली. त्यांच्यासोबत आणखी काही गुन्हेगार असावे, असा संशय आहे.शेर मोहम्मद आणि आणि नूर हसन या दोघांनी १० दिवसांपूवी रायपूर (छत्तीसगड) शहरात तीन मोठ्या घरफोड्या केल्या. त्यातून त्यांनी सुमारे दीड किलो सोन्याचे दागिने चोरले होते. त्यांनी हे दागिने सहारनपूर (उत्तराखंड) मध्ये विकले. घरफोडीचा तपास करताना रायपूरच्या गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांची माहिती आणि त्यांचा गुन्हेगारी अहवाल मिळवला. त्यातील आरोपी शेर मोहम्मद हा कुख्यात चंदन तस्कर असल्याचे स्पष्ट झाले. हे दोघे नागपूरकडे पळून येत असल्याचे लक्षात आल्यानंतर गुन्हे शाखा रायपूरचे पोलीस उपायुक्त अभिषेक माहेश्वरी यांनी शुक्रवारी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांना ही माहिती कळविली. भरणे यांनी लगेच युनिट तीनच्या पथकाला कामी लावले. त्यानुसार, पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे आणि सहायक निरीक्षक ज्ञानेश भेदोडकर यांनी आपल्या पथकातील सहकाऱ्यांसह शुक्रवारी रेल्वेस्थानकाकडे धाव घेतली. रायपूर पोलिसांकडून त्यांचे फोटो आणि अन्य माहिती आधीच मिळाली होती. त्यामुळे शालिमार एक्सप्रेसमधून उतरताच त्यांच्या संशयास्पद हालचाली टिपून या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना गुन्हे शाखेत आणून त्यांची चौकशी केली असता त्यांनी रायपूरच्या गुन्ह्यांची कबुली देऊन दीड किलो सोन्याचे दागिने सहारनपूरला विकल्याचेही सांगितले.३० वर्षांपासून तस्करीकुख्यात शेर मोहम्मद हा हिमाचल प्रदेशातील ज्वालाजी (जि. कांगडा) तसेच पंजाबमधील तहरस जिल्ह्यातील जंगलातून चंदनाची चोरी करून नंतर त्याची विक्री करतो. ३० वर्षांपासून तो चंदनतस्करीत सहभागी असून, आता तो नूर हसनसोबत घरफोडीच्या मोठ्या गुन्ह्यातही सहभागी असल्याचे पुढे आले. आरोपी नूर हसन हा अट्टल चोरटा आहे. त्याच्यावर एकट्या डेहराडूनमध्ये चोरी-घरफोडीचे २५ गुन्हे दाखल असल्याचीही माहिती आहे.
आंतरराज्यीय गुन्हेगारांच्या टोळीतील दोघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 22:37 IST
देशातील विविध प्रांतात चंदनतस्करी आणि मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी अटक केली.
आंतरराज्यीय गुन्हेगारांच्या टोळीतील दोघे जेरबंद
ठळक मुद्देचंदन तस्करी आणि घरफोडीचे गुन्हेगार दीड किलो सोने चोरून विकले गुन्हे शाखेची कामगिरी