नागपूर : अजनीच्या रानवाडीतील सीआयडी ऊर्फ शुभम नारायण ढेपे (वय २०) याची निर्घृण हत्या करणाऱ्या मुख्य आरोपींसह दोघांना पोलिसांनी अटक केली. दादू शिशुपाल हजारे आणि प्रीतम कांबळे (वय २०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार फरार आहेत.आरोपी दादू आणि शुभम काही महिन्यांपूर्वीपर्यंत सोबतच चोरी, लुटमारी करायचे. नंतर त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे सीआयडीने गुन्हेगारीतून काढता पाय घेतला. सध्या तो आणि त्याचा भाऊ पवन (वय २७) कंटेनर डेपोत कामाला जायचा. दादू हजारेच्या घरी दारूचा धंदा आहे. त्यामुळे त्याच्या घरी गुन्हेगारांची नेहमीच वर्दळ असते. शुभमशी पटत नसल्यामुळे दादू हजारे आणि अन्य गुन्हेगार साथीदार त्याला वेळोवेळी डिवचत होते. रविवारी रात्री कामठी मार्गावर एका रिसेप्शनमध्ये शुभम आणि दादूचा भाऊ इशांत या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी शुभमने इशांतच्या कानशिलात लगावली. ‘तेरे भाई को समझा, वर्ना गेम बजाऊंगा‘ अशी धमकीही दिली. त्यामुळे आरोपी दादूने सोमवारी दिवसभर शुभमचा गेम करण्याचा कट रचला. विळ्यासारखे दिसणारे ५ ते ७ चाकू आणले. गुन्हेगारांची जमवाजमव केली आणि सोमवारी रात्री ९ ते ९.३० च्या सुमारास आरोपी दादू हजारे ३ साथीदारांसह शुभमच्या घरावर चालून गेला. त्याला घराबाहेर बोलवले. काही कळायच्या आतच आरोपींनी त्याच्यावर शस्त्राचे सपासप घाव घातले. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आरोपींनी त्याला दगडाने ठेचले.(प्रतिनिधी)
अजनीतील खुनात दोघांना अटक
By admin | Updated: March 25, 2015 02:41 IST