लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील महामार्गांचे जाळे आणखी मजबूत व्हावे, यासाठी अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. भारतमाला योजनेंतर्गत मार्च २०२२ अखेरपर्यंत आणखी ८ हजार ५०० किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे काम सुरू होईल. तर राष्ट्रीय महामार्ग ‘कॉरिडॉर’वर ११ हजार किलोमीटरचे मार्ग पूर्ण होतील. २०२१-२२ या आर्थिक वर्षात आणखी आर्थिक ‘कॉरिडॉर्स’चे नियोजन करण्यात आले आहे. वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पात भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग विभागासाठी १ लाख १८ हजार १०१ कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या राज्यांतील आगामी निवडणुका लक्षात घेता, तेथे महामार्ग विस्ताराच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
- तामिळनाडूत ३ हजार ५०० किलोमीटरच्या महामार्गांना मान्यता देण्यात येईल व त्यासाठी १.०३ लाख कोटींचा खर्च येईल. पुढील वर्षी या कामाला सुरुवात होईल. मदुराई - कोल्लाम आणि चित्तूर - थच्चूर मार्गांचा या माध्यमातून विकास होईल.
- केरळ राज्यात ६५ हजार कोटींच्या ६०० किलोमीटरच्या मुंबई - कन्याकुमारी ‘कॉरिडॉर’ला मान्यता देण्यात येईल.
- पश्चिम बंगालमध्ये २५ हजार कोटी निधीतून ६७५ किलोमीटरचा महामार्ग बांधण्यात येईल. त्यात कोलकाता - सिलिगुडी मार्गाचाही समावेश असेल.
- आसाममध्ये ३४ हजार कोटींची महामार्गाची कामे सुरू होतील व तीन वर्षात १,३०० किलोमीटर मार्ग बांधण्यात येईल.
- शहरी भागात सार्वजनिक वाहतुकीसाठी १८ हजार कोटी देण्यात येतील.
- रस्ता सुरक्षेसाठी ३३६ कोटींची तरतूद केली आहे.