ईडीच्या धाडसत्रामुळे खळबळ : सट्टाबाजारात धावपळ लोकमत विशेषनरेश डोंगरे नागपूरसक्तवसुली संचालनालयाच्या धाडसत्रामुळे मध्य भारतातील बुकीबाजारात मंगळवारी प्रचंड गोंधळ उडाला. ‘गॉडफादर’च्या सोबतच आपल्यालाही अटक केली जाणार, अशी भीतीयुक्त चर्चा बुकीबाजारात पसरली. त्यामुळे अनेक बुकी ‘आऊट आॅफ कव्हरेज’ झाले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकांशी जुळलेल्या बुकीबाजारासोबत नागपुरातील अनेक ‘खिलाडी’ जुळले आहेत. ही मंडळी मध्य भारतातील सट्टाबाजाराचे नागपुरातून संचालन करतात. या बुकींचे देश-विदेशातील बड्या बुकींसोबत थेट कनेक्शन आहे. देशभर खळबळ उडवून देणाऱ्या स्पॉट फिक्सिंग (सीझन ६) प्रकरणातून दोन वर्षांपूर्वी ते उघड झाले. बुकींचे नागपूर कनेक्शन नागपूर : २०१३ मध्ये मुंबईत राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, ५ मे रोजी जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध पुणे वॉरियर्स आणि ९ मे रोजी मोहालीत राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स एलेव्हन पंजाब या संघात झालेल्या सामन्यात ‘स्पॉट फिक्सिंग’ झाल्याचे पुरावे मिळाल्यामुळे दिल्ली पोलिसांनी क्रिकेटपटू श्रीसंतसह राजस्थान रॉयलच्या तीन खेळाडूंना अटक केली होती. याच दरम्यान बिंदू दारासिंह याच्यासह नागपुरातील मनीष गुट्टेवार, बाबूराव यादव हे क्रिकेटपटू तसेच सुनील भाटिया आणि मुन्ना ऊर्फ किरण ढोले (बुकी) अशा चौघांनाही दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. यामुळे नागपुरातील बुकी कमालीचे हादरले होते. अनेकांनी विदेशात पळ काढला. काहींनी गोव्याला आश्रय घेतला तर, काही जण आपली अटक टाळण्यासाठी शिर्डीत बाबांच्या दरबारात गेले होते. दरम्यान, भाटिया कंपनीशी जुळलेल्या अन्य बुकींना अटक करण्यासाठी दिल्ली आणि त्यापाठोपाठ मुंबई पोलिसांनी वारंवार नागपूर वाऱ्या केल्या होत्या. मात्र, त्यांच्या हाती कुणी लागले नाही. काही दिवसानंतर प्रकरण शांत झाल्याचे पाहून छोटू नामक बुकीने दिल्लीत आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर सारे शांत शांत झाले.(प्रतिनिधी)बुकींची दाणादाण मंगळवारी सकाळी सक्तवसुली संचालनालयाने येथील काही बुकींशी संबंधित निवास आणि प्रतिष्ठानांवर धाडी घातल्या. त्यामुळे बुकीबाजारात वेगवेगळी चर्चा पसरली. कुणी सीबीआय, कुणी दिल्ली पोलीस तर कुणी अन्य कोणत्या तपास यंत्रणेचे नाव घेत नागपुरातील बुकींची दाणादाण उडवून दिली. आपल्यालाही अटक होऊ शकते, या भीतीपोटी अनेकांनी तातडीने नागपूर सोडले. काहींनी आपापले मोबाईल स्वीच्ड आॅफ केले. त्यामुळे बहुतांश बुकींच्या मोबाईलवर ‘आऊट आॅफ कव्हरेज’ची रिकॉर्ड वाजत होती.आयपीएलमध्ये शेकडो कोटींचे वारेन्यारे या घडामोडीनंतर काही पोलिसांचे खिसे गरम करून बुकींनी नव्या जोमाने नागपुरातून मध्य भारताचा सट्टाबाजार गरम केला. आयपीएलच्या सामन्यात शेकडो कोटींची खायवाडी करून थेट दुबई, बँकॉकपर्यंत कटिंगही (लगवाडी) केली. शहर पोलिसांनी आयपीएलदरम्यान आठ-दहा ठिकाणी धाडी घालून दोन डझन बुकींना जेरबंद केले. मात्र, हे सर्व ‘भुरटे’ होते. कोणत्याही नामांकित बुकीला अटक करण्याची कामगिरी पोलीस बजावू शकली नाही. नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये शेकडो कोटींचे वारेन्यारे करणारे बुकी सध्या ‘तीन पत्ती’चा टाइमपास करीत आहेत.ईडी अधिकाऱ्यांनी राखले अंतरकोणत्याही गुन्ह्यातील आरोपीला अटक करताना स्थानिक पोलिसांना माहिती देण्याचा शिरस्ता आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी बुकीच्या रामदासपेठेतील निवासस्थानात दिवसभर झाडाझडती घेतली. मात्र, तो हाती लागला नाही. त्यामुळे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी वारंवार संपर्क करूनही ‘त्या’ बुकीला अटक केली नसल्याचे संक्षिप्त उत्तर देऊन इडीच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी अंतर राखल्याची माहिती आहे.
बुकी ‘आऊट आॅफ कव्हरेज’
By admin | Updated: July 15, 2015 03:36 IST