लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाची बोगस जाहिरात काढून जिल्ह्यातील मागासवर्गीय प्रवर्गासाठी चालविण्यात येणाऱ्या २० अनुदानित वसतिगृहांची साफसफाई करण्याचे कंत्राट देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण विभागाच्या कार्यालयीन अधीक्षकांनी सदर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
आरोपी श्रीकांत डोईफोडे याने जाहिरातीसाठी समाजकल्याण विभागाच्या बनावट लेटरहेडचा वापर केला. जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांच्या नावाने तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील मागासवर्गीय प्रवर्गासाठी चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहांच्या साफसफाईचे कंत्राट देण्याची जाहिरात दिली होती. त्यानंतर बुधवारी ५ मार्च २०२५ रोजी विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या २० वसतिगृहांच्या साफसफाईकरिता कंत्राटी पद्धतीनुसार सी. एस. आर. निधीमधून निवड करण्यात आल्याचे नागपूर शहरातील मानेवाडा रोड, नरेंद्र नगर असा पत्ता असलेल्या अकाश एंटरप्राइजेस या कंपनीला कळविले. २१ मार्च २०२५ पासून आपण आपली सुविधा उपलब्ध करण्याची सूचना केली. कंपनीने या संदर्भात समाजकल्याण विभागाकडे विचारणा केली असता किशोर भोयर है ५ व ६ मार्च रोजी रजेवर असल्याने अशा स्वरूपाची जाहिरात देणे शक्य नाही.
मग काय झाले?हा बोगस जाहिरातीचा प्रकार असल्याचे विभागाच्या निदर्शनास आले. याची दखल घेत विभागाने सदर पोलिसांत श्रीकांत डोईफोडे याच्या विरोधात तक्रार केली आहे. श्रीकांत डोईफोडे व अकाश एंटरप्राइजेसच्या पदाधिकाऱ्यांशी झालेले संभाषण रेकॉर्ड करण्यात आले आहे. डोईफोडे यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे विभागाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.