लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांचे थवे दीक्षाभूमीवर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत उतरत होते, ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी. सायंकाळी दीक्षाभूमी परिसराला निळ्या महासागराचे स्वरूप आले. विशाल, उचंबळणारा, गर्जणारा आंबेडकरी अनुयायांचा हा भीमसागर देशभरातून आला. जय बुद्ध व जयभीमच्या जयघोषाने अख्खा परिसर दुमदुमला होता.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या समतानिष्ठ विचारांना पुनर्जीवित केले. हजारो वर्षे दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाची अस्मिता जागृत केली. बुद्ध तत्त्वज्ञानाला समाजमनात रुजविण्याचे क्रांतिदर्शी कार्य बाबासाहेबांनी पूर्ण केले. या तत्त्वज्ञानातूनच जगात शांती नांदेल, असा आत्मविश्वास समाजमनात पेरण्यासाठी नागपूरच्या दीक्षाभूमीवर ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्याला प्रारंभ झाला. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर नेपाळ, थायलॅण्ड, जपान, श्रीलंका येथूनही अनुयायी दीक्षाभूमीवर आले होते. गुरुवारी लाखो अनुयायांच्या गर्दीने दीक्षाभूमी फुलून गेली होती. युवकांच्या झुंडीच्या झुंडी ‘जयभीम’चा नारा देत गर्दीत सामील होत होत्या. गर्दी अफाट असली तरी सर्वच एकमेकांना सांभाळून घेत होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांची भाषा विविध असली तरी ‘जयभीम’ या एकाच शब्दाने मदतीचा हात समोर येत होता.पवित्र अस्थींच्या दर्शनासाठी रांगदीक्षाभूमी येथील स्तूपामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींचे जतन केलेला कलश दर्शनार्थ ठेवण्यात आला आहे. या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी बौद्ध अनुयायांनी प्रचंड गर्दी केली होती. बुधवारी लागलेली रांग गुरुवारी रात्री उशिरापर्यंत कायम होती. दीक्षाभूमी परिसरातील बोधी वृक्षाला आकर्षक रोषणाईने सजविले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील दीक्षाभूमीचा परिसर तेजाने न्हावून निघाला होता. समता सैनिक दलाचे सैनिक आपली सेवा व सुरक्षा पुरविताना दिसून आले. हजारो मैलावरून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांसाठी हजारावर संघटना सरसावल्या. पाण्यापासून ते भोजनदानाची चोख व्यवस्था त्यांनी केली होती.वस्त्या-वस्तांमधून निघाली रॅलीनागपूरच्या विविध वस्त्यांमध्ये ‘भीम रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. दुपारी निघालेली रॅली सायंकाळी दीक्षाभूमीवर पोहचताच एकच जल्लोष होत होता. पांढऱ्या वस्त्रातील अनुयायी ‘बुद्धं शरण्म’च्या जयघोषात एकमेकांना शुभेच्छा देत होते. इंदोरा, टाकळी सीम, नारा, बेझनबाग, अंबाझरी, गोपालनगर, त्रिमूर्तीनगर, चंदननगर, जाटतरोडी, चंद्रमणीनगर, नवीन बाभूळखेडा, मानेवाडा, दिघोरी या सारख्या कितीतरी वस्त्यांमधून रॅली निघाल्या.
दीक्षाभूमीत उसळला निळा महासागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 23:09 IST
हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांचे थवे दीक्षाभूमीवर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत उतरत होते, ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी. सायंकाळी दीक्षाभूमी परिसराला निळ्या महासागराचे स्वरूप आले. विशाल, उचंबळणारा, गर्जणारा आंबेडकरी अनुयायांचा हा भीमसागर देशभरातून आला. जय बुद्ध व जयभीमच्या जयघोषाने अख्खा परिसर दुमदुमला होता.
दीक्षाभूमीत उसळला निळा महासागर
ठळक मुद्देजय बुद्ध, जयभीमचा जयघोष : बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इतर देशातूनही आले अनुयायी