लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सकाळी ठीकठाक सुरू असलेले काम एका भीषण स्फोटसदृश आवाजाने थांबले आणि पुढच्याच क्षणी तब्बल १५ लाख लिटर पाणी असलेली पाण्याची टाकी मोठ्या आवाजात फुटली. प्रचंड वेगाने आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने परिसरातील कामगार अक्षरशः खेळण्यांसारखे फेकले गेले. टाकीच्या आसपास काम करणारे संतोष गौतम यांच्यासह जवळपास २० ते २५ कामगार काही कळण्याच्या आत पाण्यात बुडाले, तरंगू लागले.
पाण्याचा जोर इतका भयानक होता की डोकी, हात, पाय यांना जबर मार बसला. काही क्षणांतच पाण्यात रक्त मिसळले आणि स्वच्छ पाणी रक्ताने लाल झाले. आम्ही सगळे मृत्यूच्या दाढेत अडकलो होतो, जिवाच्या भीतीने प्रत्येक जण मदतीसाठी ओरडत होता; पण, आमचा आवाज ऐकायला कुणीच नव्हते, अशी अंगावर काटा आणणारी आपबिती जखमी कामगार संतोष गौतम यांनी सांगितली.
ही थरारक घटना शुक्रवारी बुटीबोरी येथील एमआयडीसी फेज-२मधील 'अवाडा' कंपनीत घडली. सध्या संतोष गौतम (२७) यांच्यावर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्या डाव्या कानाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला संतोष गेल्या सहा महिन्यांपासून या कंपनीत वेल्डिंगचे काम करीत होता. त्याने 'लोकमत'ला सांगितले, सकाळी काम सुरू असतानाच अचानक मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज झाला. अन् पाण्याचा महापूर अंगावर कोसळला.
कार्यालय विखुरले, वाहनांचे नुकसान
पाण्याच्या टाकीत लाखो लिटर पाणी होते. टाकी फुटताच हे पाणी वेगाने बाहेर आले. त्यात कामगारांसह परिसरातील तात्पुरते कार्यालय, वाहनेदेखील दूरवर फेकली गेली. यात काही कामगार जखमी झाले.अनेक कामगारांच्या वाहनांचेदेखील नुकसान झाले तसेच तेथील अनेक यंत्रसामग्रीदेखील विखरल्या गेल्या.संबंधित टाकी इतर दोन टाक्यांशीदेखील 53 जोडली गेली होती. तेथील काही आऊटर पाइप्सदेखील निघाल्याचे घटनास्थळी दिसून आले.
२०० मीटरपर्यंत मृत्यूचा प्रवास
संतोष गौतम याने सांगितले, की आम्ही जवळपास २०० ते ३०० मीटरपर्यंत त्या पाण्याच्या दाबाने वाहत गेलो. लोखंडी सळाखी, सिमेंटचे तुकडे आणि पाण्याचा तो आक्राळविक्राळ वेग... शरीर कुठे आपटत होतं तेही कळत नव्हतं. डोक्याला आणि कानाला गंभीर जखमा झाल्या होत्या. जेव्हा शुद्धीवर आलो, तेव्हा पाहिले तर माझ्यासोबतचे अनेक सहकारी पाण्यात तरंगत होते. प्रत्येकाच्या शरीरातून रक्त वाहत होते.
अर्धा तास मृत्यूशी झुंज
अर्ध्या तासापर्यंत ना रुग्णवाहिका आली, ना कंपनीचे कोणी वाचवायला आले. डोक्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. मृत्यू डोळ्यांसमोर दिसत होता, अशा शब्दांत संतोषने त्या भीषण दुर्घटनेचा पाढा वाचला. जखमी अवस्थेत स्वतःचा जीव वाचविण्यासाठी त्याने रुमालाने जखम दाबून धरली आणि शुद्ध हरपण्यापूर्वी कोणातरी अज्ञात हातांनी त्याला रुग्णवाहिकेत टाकले.
प्रकृती स्थिर, पण मनावरचा घाव खोल
डॉक्टरांच्या मते संतोषची प्रकृती आता स्थिर आहे; मात्र, त्या भीषण अपघाताच्या आठवणीने तो अजूनही थरथरत आहे. खापरखेडाहून आलेला त्याचा मावसभाऊ लाल बहादूर गौतम याच्या चेहऱ्यावरही आपल्या भावाला या मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बघून दिलासा मिळत असला, तरी कंपनीच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
Web Summary : A water tank burst at Butibori's Avada company, injuring workers. Santosh Gautam, a survivor, recalls the horrifying rush of water mixed with blood, fearing for his life amidst the chaos. Many were swept away, battling for survival for half an hour before help arrived.
Web Summary : बुटीबोरी की अवाडा कंपनी में पानी की टंकी फटने से मजदूर घायल हो गए। एक बचे हुए संतोष गौतम ने खून से मिले पानी के भयावह सैलाब को याद करते हुए अराजकता के बीच अपनी जान जाने का डर जताया। मदद आने से पहले कई लोग बह गए, आधे घंटे तक जीवन के लिए संघर्ष करते रहे।