कामठीत भाजपचे पानिपत, काँग्रेसचा दमदार विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 02:09 PM2021-10-08T14:09:56+5:302021-10-08T14:45:03+5:30

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसने घवघवीत यश संपादन केले आहे.

BJP's Panipat in Kamathi, Congress's strong victory | कामठीत भाजपचे पानिपत, काँग्रेसचा दमदार विजय

कामठीत भाजपचे पानिपत, काँग्रेसचा दमदार विजय

Next
ठळक मुद्देनिधान, चिकटे हरले तर लेकुरवाळे, ढोलेंनी मैदान मारले

सुदाम राखडे

नागपूर : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कामठी तालुक्यात जि.प. आणि पं.स.च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपाचे पानिपत केले.

तालुक्यात गुमथळा, वडोदा जि.प. सर्कल तर महालगाव आणि बिडगाव पं.स. गणात ही पोटनिवडणूक झाली होती. त्यात गुमथळा सर्कलमध्ये जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अनिल निधान यांचा काँग्रेसचे दिनेश ढोले यांनी ३,५९५ मतांनी पराभव केला. ढोले यांना १०,४७४ तर निधान यांना ६,८७९ मते मिळाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी येथे भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता.

भाजपने येथे योगेश डाफ यांना उमेदवारी दिली होती. नंतर निधान यांच्या बंडानंतर डाफ यांनी माघार घेतली. शेवटी निधान भाजपच्या समर्थनाने कमळाविनाच गुमथळ्याच्या मैदानात उतरले होते. मात्र मतदारांनी त्यांना नाकारले. वडोदा सर्कलमध्ये काँग्रेसच्या प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांनी १०,८९९ मते घेत भाजपच्या अनिता चिकटे यांचा २,८४९ मतांनी पराभव केला. चिकटे यांना ८,०५० मते मिळाली.

प्रहार जनशक्तीच्या सोनम करोडभाजने यांना १२५८ मते मिळाली. कामठीच्या पोटनिवडणुकीत आ. टेकचंद सावरकर यांची जादू चालली नाही. कामठी तालुक्यातील भाजप उमेदवारांसाठी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. टेकचंद सावकर यांनी मोर्चेबांधणी केली होती. मात्र अंतर्गत गटबाजीपुढे नेत्यांचेही काही चालले नाही. उलट काँग्रेस उमेदवारांसाठी मंत्री सुनील केदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांनी विरोधकांपुढे मजबूत तटबंदी उभी केल्याने येथे काँग्रेसचा विजय सुकर झाला.

महालगाव पंचायत समिती गणात काँग्रेसच्या सोनू मनोज कुथे यांनी ४,८७३ मते घेत भाजपच्या वंदना हटवार यांचा ११६४ मतांनी पराभव केला. हटवार यांना ३७०९ मते मिळाली. अपक्ष यशोदा राम वर्मा यांना २९६ मते मिळाली.

बिडगाव पंचायत समिती गणात काँग्रेसचे आशिष मल्लेवार यांनी ५,९३८ मते घेत भाजपचे प्रमोद कातुरे यांचा पराभव केला. कातुरे यांना ४८५८ मते मिळाली. येथे वंचित बहुजन आघाडीच्या मृणाली जामगडे यांना ४८०, शिवसेनेचे कपूर चांभारे यांना ३५० तर अपक्ष अजित जामगडे यांना ३३३ मते मिळाली.

पंचायत समितीत काँग्रेसचे बहुमत

गतवर्षी झालेल्या पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी चार जागा मिळाल्या होत्या. यात ईश्वर चिठ्ठीत सभापतीपद भाजपकडे तर उपसभापतीपद काँग्रेसकडे आले होते. त्यात भाजपचे उमेश रडके सभापती झाले तर काँग्रेसचे आशिष मल्लेवार उपसभापती झाले होते. आता महालगाव पंचायत समिती गण काँग्रेसकडे आल्याने पं.स.त काँग्रेस ५ तर भाजपच्या तीन जागा झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात येथे काँग्रेसचा सभापती निश्चित होईल.

Web Title: BJP's Panipat in Kamathi, Congress's strong victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.