लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणने वीजबिल थकीत असलेल्यांचे कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू केली आहे. भाजप या मोहिमेचा विराेध करते. राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयाचे अनुदान दिले, तर शेतकऱ्यांसह गरीबांचेही संकट दूर होईल. चुकीचे बिल न भरल्यामुळे जर कुणाचे वीज कनेक्शन कापले गेले, तर भाजप याला विरोध करेल. अन्याय दूर होत नाही, तोपर्यंत संघर्ष केला जाईल, असा इशारा भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
पत्र परिषदेत बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, शेतकरी व गरिबांचे ७५ लाख कनेक्शन कापण्याची नोटीस महावितरणने जारी केली आहे. राज्यातील नागरिकांवर हा अन्याय आहे. वीज कनेक्शन कापण्याचा परिणाम पुढच्या पिकांवर पडेल, त्यामुळे शेतकऱ्यांवरील संकट आणखी वाढेल. फडणवीस यांच्या कार्यकाळात वीज कंपन्यांना विशेष अनुदान देण्यात आले होते, परंतु तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार गरिबांवर अन्याय करीत असल्याचे ते म्हणाले.