नागपूर महापालिकेत भाजप ‘सेफ’; जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 11:10 AM2019-11-12T11:10:03+5:302019-11-12T11:12:30+5:30

राज्यात सत्तास्थापनेवरून भाजपा-शिवसेनेच्या महायुतीत विस्तव पेटला असून राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचे पडसाद नागपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात देखील उमटणार आहेत.

BJP 'safe' in Nagpur municipality; Challenge in district council elections | नागपूर महापालिकेत भाजप ‘सेफ’; जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आव्हान

नागपूर महापालिकेत भाजप ‘सेफ’; जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आव्हान

Next
ठळक मुद्देअशी असेल सत्तास्थापनेच्या अस्थिरतेनंतरही स्थितीभाजपला धक्का नाही, समीकरणे बदलणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात सत्तास्थापनेवरून भाजपा-शिवसेनेच्या महायुतीत विस्तव पेटला असून राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही पक्षांचा अधिकृत काडीमोड झाल्यानंतर त्याचे पडसाद नागपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात देखील उमटणार आहेत. नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता आहे तर अनेक नगर परिषद व नगर पंचायतींमध्ये भाजपचे नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आले आहे. तर शिवसेनेचा रामटेक वगळता जिल्ह्यात फारसा प्रभाव नाही. त्यामुळे तेथे भाजपला धक्का बसणार नाही. परंतु भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका व नगर परिषदांच्या रिक्त नगराध्यक्षांच्या निवडीच्या वेळी राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
नागपूर महानगरपालिकेत २०१७ साली निवडणुका झाल्या होत्या व त्यादेखील भाजप-सेनेने वेगवेगळ्या लढविल्या होत्या. १५१ पैकी १०८ जागांवर भाजपचे सदस्य आहेत तर शिवसेनेचे अवघे तीनच नगरसेवक आहेत. त्यामुळे मनपामध्ये भाजपाला फारसा फरक पडणार नाही.
दुसरीकडे नागपूर जिल्ह्यात १४ नगर परिषदा आहेत. यातील १० नगर परिषदावर भाजपचे नगराध्यक्ष आहेत तर प्रत्येकी दोन ठिकाणी काँग्रेसचे आणि इतर स्थानिक राजकीय आघाड्यांचे नगराध्यक्ष आहे. जिल्ह्यात १३ पंचायत समित्या आहेत. मात्र कार्यकाळ संपल्यामुळे येथे सध्या कोणतीही राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाही. मात्र निवडणुकानंतर पंचायत समित्यामध्ये नवे सत्तासमीकरण पहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागपूर जिल्हा परिषदांच्या निवडणुका अद्याप घोषित झालेल्या नाहीत. मात्र या निवडणुकांत वर्चस्वाचा मुद्दा प्रभावी ठरणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका राजकीय पक्ष स्वतंत्र लढविणार असले तरी, सत्ता स्थापनेसाठी जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र आले तर भाजपसाठी मोठे आव्हान ठरु शकेल.

जिल्हा परिषदेत असेल वर्चस्वाची लढाई
ग्राम पंचायत, नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदांमध्ये स्थानिक पातळीवर असले राजकीय समीकरण नवे नाहीत. २०१२ मध्ये नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने, शिवसेनेचा हात सोडून राष्ट्रवादीचा हात धरला होता. मात्र अडीच वर्षात दोघांचीही फाटाफूट झाली आणि भाजपाने परत आपला मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता थाटली. ू२०१२ मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका सर्वच पक्षाने स्वतंत्र लढविल्या होत्या. तेव्हा २२ जागा मिळवित भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
काँग्रेस पक्षानेही १९ जागा मिळविल्या होत्या. राष्ट्रवादी ७ तर शिवसेना ८ जागेवर होती. निवडणुकीच्या काळात भाजप शिवसेनेमध्ये झालेल्या मान अपमानावरून भाजपाने राष्ट्रवादीशी बोलणी वाढविली त्यामुळे शिवसेनेला विरोधी बाकावर बसावे लागले. दरम्यान, भाजपा-सेना युती तुटली व नवीन समीकरणे निर्माण झाली तर पडसाद जिल्ह्याच्या राजकारणातही उमटू शकतात. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वर्चस्वाचा मुद्दा प्रभावी ठरणार आहे व शिवसेना-भाजप दोन्ही पक्ष यावरुन आमनेसामने येऊ शकतात.

नागपूर जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या सध्याच्या राजकीय स्थितीवर नजर टाकल्यास नरखेड नगरपरिषदेत नगर विकास आघाडीचा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आला आहे. येथे भाजप-सेना स्वतंत्र निवडणूक लढले होते. स्थानिक नगर विकास आघाडीला सेनेचा पाठिंबा आहे.
मोवाड नगरपरिषदेत भाजपाचा नगराध्यक्ष आहे. येथे भाजपा-शिवसेना एकत्र लढले होते. येथे भाजपाला शिवसेनेचा पाठिंबा आहे. येथे नगरसेवकांनी नगराध्यक्षांची निवड केली आहे. या नगरपरिषदेचा कार्यकाळ वर्षभरात संपुष्टात येणार आहे.
काटोल नगरपरिषदेत विदर्भ माझा (अपक्ष) चा नगराध्यक्ष आहे. नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवड झाली आहे. येथे भाजप-सेना एकत्र लढले होते.
कळमेश्वर नगरपरिषदेत भाजपचा नगराध्यक्ष आहे. येथे भाजप-सेना एकत्र लढले होते. नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवड झाली. मात्र नगरपरिषदेत शिवसेनेचा कॉँग्रेसला पाठिंबा आहे.
मोहपा नगर परिषदेत कॉँग्रेसचा नगराध्यक्ष आहे. येथे भाजप-सेना एकत्र लढले होते. मात्र बहुमत असल्याने कॉँग्रेस नगराध्यक्ष झाला. या नगरपरिषदेचा कार्यकाळ दोन वर्षानंतर संपुष्टात येईल.
सावनेर नगरपरिषदेत भाजपाचा नगराध्यक्ष आहे. येथे नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवड झाली आहे. भाजप-शिवसेना येथे स्वंतत्र निवडणूक लढले होते.
खापा नगर परिषदेत भाजपाचा नगराध्यक्ष आहे. येथे भाजपा-शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढले होते. नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवड झाली आहे.
रामटेक नगरपरिषदेत भाजपाचा नगराध्यक्ष आहे. येथे भाजपा-सेना स्वतंत्र निवडणूक लढले होते. नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवड झाली आहे.
उमरेड नगर परिषदेमध्येही भाजपाच्या नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवड झाली आहे. येथेही भाजपा-शिवसेना स्वतंत्र लढले होते.
कामठी नगरपरिषदेत काँग्रेसचा नगराध्यक्ष आहे. येथेही भाजपा-शिवसेना स्वतंत्र लढले होते.
कन्हान नगरपरिषदेत भाजपाचा नगराध्यक्ष आहे. येथे भाजपाला बहुमत आहे. या नगरपरिषदेचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार आहे.
वाडी नगपरिषदेमध्ये सध्या भाजपाचा नगराध्यक्ष आहे. येथे पहिल्या अडीच वर्षात भाजपाच्या पाठिंब्याने काँग्रेसच्या नगराध्यक्षा होत्या. या नगरपरिषदेत एप्रिल-२०२० मध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत.
वानाडोंगरी नगरपरिषदेत भाजपाचा नगराध्यक्ष आहे. येथे नगराध्यक्षाची थेट जनतेतून निवड झाली आहे. भाजप-सेना स्वंतत्र निवडणूक लढले होते. नव्यानेच अस्तित्वात आलेल्या बुटीबोरी नगरपरिषदेत भाजपाचा नगराध्यक्ष आहे. येथे भाजप-सेना एकत्र निवडणूक लढले होते.
नगर परिषदांमध्ये नवीन समिकरणे
महायुती तुटली तर सद्यस्थितीत ज्या नगर परिषद आणि नगर पंचायतीत भाजपचे नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आले आहेत त्यांना राज्यातील राजकीय उलथापलथीचा कोणताही फटका बसणार नाही. मात्र या नगराध्यक्षांना भविष्यातील राजकीय समीकरणावरून नगर परिषदेचा कारभार चालविताना अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात जिल्ह्यातील काही नगर परिषदांचे नगराध्यक्ष मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी पक्षांतर करण्याची शक्यता राजकीय जाणकाराकडून व्यक्त केली जात आहे. इकडे कायद्यातील तरतुदीनुसार अपवादात्मक स्थितीत नगरध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव आणण्याची तरतूद असली तरी राजकीय समीकरण किंवा आघाड्या याचे कारण ठरू शकत नाहीत, हे विशेष.
नागपूर जिल्ह्यात १४ नगर परिषदा आहेत. यातील १० नगर परिषदावर भाजपचे नगराध्यक्ष आहेत तर प्रत्येकी दोन ठिकाणी काँग्रेसचे आणि इतर स्थानिक राजकीय आघाड्यांचे नगराध्यक्ष आहे. जिल्ह्यात मोहपा, कन्हान आणि वाडी नगर परिषदांमध्ये जुन्या कायद्यानुसार नगराध्यक्षांची निवड झाली आहे. 

Web Title: BJP 'safe' in Nagpur municipality; Challenge in district council elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.