नितीन गडकरी : आसाम विद्यापीठाचा १८ वा दीक्षान्त समारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासनाने धान्यापासून इंधन निर्मितीला आता परवानगी दिली आहे. याचा फायदा घेत जैविक इंधनाची अर्थव्यवस्था ५ लाख कोटींची करणे देशासाठी आवश्यक आहे. संशोधन, नावीन्यपूर्ण संकल्पना यामुळे हे शक्य झाले असून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी हे आवश्यक असून हा आत्मनिर्भरतेचा मार्ग आहे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
आसाम विद्यापीठाचा १८ वा दीक्षान्त समारंभ सिल्चर येथे शुक्रवारी पार पडला. या समारंभात प्रमुख अतिथी म्हणून गडकरी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल प्रामुख्याने उपस्थित होते.
शिक्षण ही एक शक्ती आहे. संशोधन, उद्यमशीलता, विज्ञान, तंत्रज्ञान, नावीन्य, कौशल्य आणि यशस्वी प्रयोग म्हणजे ज्ञान. हे ज्ञान मिळविल्यानंतर मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांनी मागास भागात सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी करावा, असे आवाहनही गडकरी यांनी केले.
बॉक्स
अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी ‘सीएं’ची भूमिका महत्त्वाची
भारत हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी प्रयत्न करीत असताना भविष्यात देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी ‘सीएं’ची भूमिका अतिशय महत्त्वाची राहणार असून सर्वच क्षेत्रात आर्थिक नियोजन करावे लागणार आहे, असे आयसीएआयच्या ३५ व्या प्रादेशिक परिषदेत बाोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.