लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाची बनावट (बोगस) वेबसाईट तयार करून त्यावर विविध पदांसाठी पदभरती करण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. ही वेबसाईट बोगस असून जिल्हा परिषद नागपूरचा या वेबसाईटशी संबंध नाही, उमेदवारांनी अशा वेबसाईटपासून सावध असावे, असे आवाहन निवड समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी विमला आर. व जिल्हा परिषद नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत नागपूर जिल्हा परिषदेसाठी आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, लॅब तंत्रज्ञ, औषध निर्माता, फवारणी कर्मचारी, अशा विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असल्याचे या वेबसाईटवर दिसत आहे. त्यावर हेल्पलाईन क्रमांक देण्यात आले आहे. ०७२९२००६३०५, ७२९२०१३५५०, ९५१३५००२०३ असे काही संपर्क क्रमांक देण्यात आले आहे. तथापि, हा प्रकार फसवणुकीचा असून याला बळी पडू नये, असे प्रशासनाने म्हटले आहे. यासंदर्भात संबंधित गैरप्रकार करणाऱ्या व सामाजिक तत्त्वांबाबत सायबर सेल आपली कारवाई करत आहे. मात्र उमेदवारांनी अशा अपप्रचाराला बळी पडू नये असे, आवाहन त्यांनी केले आहे.
नागपूर जिल्हा परिषदेमार्फत मार्च २०१९ मध्ये यापूर्वीच पद भरतीसाठी जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीमध्ये सर्वसाधारण खुला प्रवर्गातील वाढीव समांतर आरक्षण व नवीन प्रवर्गानुसार फक्त दिव्यांग आरक्षणासाठी पद भरती सुरू आहे. यावेळी या संदर्भातील शुद्धिपत्रक जारी करण्यात आली असून फक्त दिव्यांग उमेदवार भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज मागविण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एमएएचएआरडीडीझेडपी डॉट कॉम (www.maharddzp.com) या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहे.
२०१९ मध्ये दिव्यांगाशिवाय अन्य उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. अधिक व अचूक माहितीसाठी दिव्यांग व्यक्तींनी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एमएएचएआरडीडीझेडपी डॉट कॉम (www.maharddzp.com) किंवा डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट नागपूर झेडपी डॉट कॉम (www.nagpurzp.com) या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.