लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - बेलतरोडीतील एका अधिकाऱ्याकडे चोरट्यांनी घरफोडी करून रोख आणि १४ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी रात्री ही धाडसी घरफोडीची घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.
बेलतरोडीतील चिरंजीवी नगरात भास्कर सव्वालाखे (वय ५८) राहतात. ते भंडाऱ्याला सनफ्लॅग कंपनीत काम करतात. आठवड्यातील पाच दिवस ते पत्नीसह तिकडेच राहतात तर शनिवार, रविवार नागपुरात असतात. इतर दिवशी त्यांचा मुलगा रोहित सव्वालाखे घरी असतो. शुक्रवारी रात्री मावशीचा वाढदिवस असल्यामुळे रोहित त्याच्या दाराला कुलूप लावून रात्री ७.३० वाजता तिकडे गेला. रात्री ११.३० वाजता परत आला. त्याला त्याच्या दाराचे कुलूप तुटून दिसले. चोरट्यांनी घरातील साहित्य अस्तव्यस्त करून आतमधून १४ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख ४० हजार असा एकूण ४ लाख, ८७ हजारांचा ऐवज चोरून नेला. रोहितने त्याच्या आईवडिलांना या घटनेची माहिती दिली. नंतर बेलतरोडी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांचे धागेदोरे शोधण्याचे प्रयत्न केले. सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
----
मानकापुरातही घरफोडी
नागपूर - मानकापुरातही चोरट्यांनी एका महिलेच्या घरातून रोख आणि सोन्याचे दागिने लंपास केले. शाहजा बेगम मोहम्मद युनूस (वय ५८) या मानकापूरच्या नटराज सोसायटीत राहतात. १६ जूनला त्या त्यांच्या मुलीच्या घरी गेल्या होत्या. शुक्रवारी सायंकाळी परत आल्या तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी रोख ३० हजार तसेच सोन्याचे दागिने लंपास केले. मानकापूर पोलिसांनी या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
----