ध्येयाशी प्रामाणिक रहा

By admin | Published: November 29, 2015 03:56 AM2015-11-29T03:56:20+5:302015-11-29T03:56:20+5:30

आयुष्यात ध्येय, लक्ष्य निश्चित करणे आवश्यक असते. ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची नितांत आवश्यकता असते.

Be honest with the goal | ध्येयाशी प्रामाणिक रहा

ध्येयाशी प्रामाणिक रहा

Next

संदीप तामगाडगे यांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र : कार्यगौरव सोहळा व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
नागपूर : आयुष्यात ध्येय, लक्ष्य निश्चित करणे आवश्यक असते. ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची नितांत आवश्यकता असते. आपल्या ध्येयाशी प्रामणिक राहाल तर यशापर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही. म्हणून उठा, जागे व्हा, लक्ष्याच्या प्राप्तीपर्यंत थांबू नका, हा गुरुमंत्र केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोमध्ये (सीबीआय) आपली सेवा देणारे डीआयजी संदीप तामगाडगे यांनी शनिवारी विद्यार्थ्यांना दिला.

महात्मा जोतिबा फुले स्मृती दिनानिमित्त जोतिबा फुले अभ्यासिका व ग्लोबल पीस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संदीप तामगाडगे यांचा कार्यगौरव सोहळा व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर होते. व्यासपीठावर मुख्य मार्गदर्शक म्हणून केंद्र उत्पादन शुल्कचे सहायक आयुक्त प्रशांत रोकडे, आयकर विभागाचे उपायुक्त डॉ. उपसेन बोरकर, एन.ए.ठमके उपस्थित होते.
२००१ च्या नागालॅण्ड कॅडरचे आयपीएस अधिकारी असलेले व उत्कृष्ट कार्याचे २००७ सालचे राष्ट्रपती पदक मिळालेले तामगाडगे म्हणाले, सातवीत नापास झाल्यानंतर वडिलांचा तो उपदेश कधीच विसरलो नाही. त्यानंतर कोणत्याही परीक्षेत नापास झालेलो नाही.
बारावीची परीक्षा दिल्यानंतर घरातील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीची जाणीव झाली. त्यावेळी तीन वर्षांतच नागरी परीक्षा पास करण्याचे ठरविले आणि त्या मार्गाने वाटचाल केली. वयाच्या २२ व्या वर्षी ही परीक्षा पास केली. परीक्षेचे नियोजन, वेळेचे नियोजन, कष्ट करण्याची तयारी आणि यात प्रामाणिकता असेल तर कुठलीच परीक्षा कठीण नाही.
नागरी परीक्षेसाठी सलग आठ तास प्रामाणिकपणे अभ्यास करण्याची तयारी ठेवावी. सोबतच काय वाचायचे आहे, ते माहीत असणे आवश्यक आहे. आयुष्य एकदाच मिळते. ते चांगले जगायचे की वाईट हे आपल्याच हातात असते.
तुमच्या परिस्थितीची जाणीव, आई-वडिलांच्या अपेक्षा या जेवढ्या लवकर समजून घ्याल तेवढेच चांगले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा आणि आई-वडिलांमुळे मला हे यश गाठते आले, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)

नागालॅण्डच्या मुख्यमंत्र्यांकडून तामगाडगेंच्या कार्याचे कौतुक
नागालॅण्डचे मुख्यमंत्री टी. आर. झेलिआंग यांनी पाठविलेल्या संदीप तामगाडगे यांच्या कार्याच्या कौतुकाचे आणि शुभेच्छा संदेशाचे वाचन हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. संदेशात, तामगाडगे यांनी नागालॅण्ड आणि सीबीआय या दोघांसाठीही प्रामाणिकतेने कष्ट घेतले आहे. नागरीक केंद्रित आणि नेहमी मदतीला धावून जाणाऱ्या तामगाडगे यांनी नागालॅण्डचे नाव उज्वल केले आहे, असे नमूद आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तामगाडगे यांच्या कार्याचा गौरव
गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपाली मासीरकर, मेट्रोचे गोघाटे, पोलीस अधिकारी एस.डी. मिश्रा, जिल्हा समाज कल्याणचे अधिकारी सिद्धार्थ गायकवाड, आ. पंकज भोयर, धम्मज्योती गजभिये, के.एस. इंगळे, अतुल खोब्रागडे यांनी आपल्या मनोगतातून तामगाडगे यांच्या कार्याचा गौरव केला.
‘म. जोतिबा फुले यांचे जीवन व कार्य’ पत्रिकेचे प्रकाशन
दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तामगाडगे यांना मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांच्यासोबत त्यांची आई कुसुम तामगाडगे व पत्नी लीना तामगाडगे उपस्थित होत्या. प्रास्ताविक बानाईचे सुनील तलवारे यांनी केले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले तर आभार एन. ए. ठमके यांनी मानले. कार्यक्रमात विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी तामगाडगे यांचा सत्कार केला. ‘महात्मा जोतिबा फुले यांचे जीवन व कार्य’ या पत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित झाले.
सभागृहाच्या आत आणि बाहेरही गर्दी
तामगाडगे यांना ऐकण्यासाठी वसंतराव देशपांडे सभागृह खच्चून भरले होते. आयोजकांना ऐनवेळी सभागृहाच्या बाहेर स्क्रिन लावावे लागले. सभागृहाच्या बाहेरही बरीच गर्दी होती. या कार्यक्रमाला आ. प्रकाश गजभिये व विविध संस्थांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

बाबासाहेबांना अपेक्षित असलेला ‘नायक’
यशवंत मनोहर म्हणाले, बाबासाहेबांच्या चळवळीत तयार झालेले संदीप तामगाडगे हे ‘मिसाईल मॅन’ आहेत. बाबासाहेबांना अपेक्षित असलेला नायक, जो क्रांतीच्या चळवळीला अपेक्षित आहे, असे तामगाडगे यांचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या कार्यगौरव सोहळ्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येत युवकांनी एकत्र येणे हा त्यांच्या कार्याचा आदर आहे. या नायकाची प्रेरणा घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.
‘क्वालिटी’ अभ्यास आवश्यक
डॉ. बोरकर म्हणाले, पदवीचे शिक्षण घेत असतानाच पहिल्या वर्षांपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करावा. आपल्या मनातील न्यूनगंड काढावा. ‘हो मी हे करू शकतो’, अशी सकारात्मक वृत्ती ठेवावी. आपल्या चुका आपणच सुधारल्यास आणि ‘क्वालिटी’ अभ्यास केल्यास यश हमखास मिळते. प्रशांत रोकडे म्हणाले, स्वप्न पहा, ते पूर्ण करण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी ठेवा, प्रामाणिक रहा, वेळेचे नियोजन करा, यश तुमच्या जवळ येईल.

Web Title: Be honest with the goal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.