सावधान! पार्ट्या बेतू शकतात जीवावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 08:16 PM2020-05-27T20:16:25+5:302020-05-27T20:17:59+5:30

चौथ्या लॉकडाऊनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ४३० च्या वर पोहोचली असली तरी घरात बसून कंटाळलेल्या तरुणाईचा अलीकडे भेटीगाठी आणि पार्ट्यांवर भर दिसून येत आहे. सरकार एकीकडे ‘फिजिकल डिस्टन्स’ पाळा असे सांगत असताना शहराच्या आऊटर भागांमध्ये या पार्ट्या रंगत आहेत. अशा पार्ट्यांमध्ये ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळण्यात येत नसल्याने ‘त्या’ पार्ट्या ‘कोरोना फ्रेंडली’ बनण्याची अधिक शक्यता आहे.

Be careful! Parties can be fun ... | सावधान! पार्ट्या बेतू शकतात जीवावर...

सावधान! पार्ट्या बेतू शकतात जीवावर...

Next
ठळक मुद्देलोकमत जागर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चौथ्या लॉकडाऊनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ४३० च्या वर पोहोचली असली तरी घरात बसून कंटाळलेल्या तरुणाईचा अलीकडे भेटीगाठी आणि पार्ट्यांवर भर दिसून येत आहे. सरकार एकीकडे ‘फिजिकल डिस्टन्स’ पाळा असे सांगत असताना शहराच्या आऊटर भागांमध्ये या पार्ट्या रंगत आहेत. अशा पार्ट्यांमध्ये ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळण्यात येत नसल्याने ‘त्या’ पार्ट्या ‘कोरोना फ्रेंडली’ बनण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे वेळीच सावधान! अन्यथा या पार्ट्या जीवावरही बेतू शकतात.
नागपूर शहरांमध्ये चौथ्या लॉकडाऊनपर्यंत प्रशासनाने बरेच निर्बंध घातले होते. संपूर्ण शहरात टाळेबंदीचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याने आणि शासकीय व खासगी कार्यालयेदेखील बंद असल्याने शहरातील वाहतूक आणि बाजारातील गर्दी अत्यंत मर्यादित होती. तब्बल दोन महिन्याच्या जवळपास चाललेल्या या काळात नागरिकांची झालेली अडचण व व्यापारी तसेच कामगारांकडून लॉकडाऊन उठवण्याची मागणी लक्षात घेता चौथ्या टप्प्यामध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. शहरातील वर्दळ यामुळे वाढली आहे. चौकातील बंदोबस्तही काहीसा शिथिल झाला आहे. यात भरीस भर म्हणून ग्रामीण भागातील मद्यविक्री सुरू झाली असून शहरात परवानाधारकांना आॅनलाईन मद्यविक्री केली जाते आहे.
प्रशासनाने दिलेल्या या शिथिलतेचा गैरफायदा अलीकडे घेणे सुरू झाले आहे. गेल्या आठवडाभरात तरुणांच्या पार्ट्यांना ऊत आला आहे. विशेषत: शहराच्या आऊटर भागांमध्ये या पार्ट्या रंगायला लागल्या आहेत. या पार्ट्यांमध्ये मद्य, मांसाहार आणि सिगारेटचा सर्रास वापर होत आहे. ग्रामीण भागात आता मद्य सहज उपलब्ध होत असल्याने या पार्ट्या आता अधिकच रंगायला लागल्या आहेत. यामुळेच शहरातील आऊटर भागांना या पार्ट्यांसाठी पसंती दिली जात आहे.

कारणे अनेक
या पार्ट्यांसाठी अनेक कारणे सांगितली जात आहेत. मित्रांचे वाढदिवस, जुन्या राहून गेलेला पार्ट्या, बऱ्याच दिवसात न झालेल्या भेटीगाठी, व्यावसायिक चर्चा तसेच निव्वळ एन्जॉय म्हणूनही या पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. या पार्ट्या अगदी जवळीक साधून होत असल्याने फिजिकल डिस्टन्सचे कसलेही बंधन पाळणे शक्यच नाही.

झुरका ठरू शकतो घातक
अशा ओल्या पार्ट्यांमध्ये सिगारेटचा सर्रास वापर होतो. मित्रत्वाच्या नात्यात एकाच सिगारेटचा अनेकांनी झुरका घेण्याचा प्रकार चालतो. मात्र अशा पार्टीतील एक झुरकासुद्धा कोरोनाच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरू शकतो. मद्याचा कैफ चढल्यावर एकमेकांना आलिंगन देण्याचेही सर्रास प्रकार घडतात. त्यामुळे कोरोना पसरण्यास आयतीच संधी मिळते.

नियम आणि कायद्याची ऐशीतैशी
या काळात सुरू असलेल्या या पार्ट्यांमध्ये नियम आणि कायद्याची पायमल्ली सुरू आहे. डबलसीट जाण्यावर बंदी असली तरी अनेक जण असा प्रवास करत आहेत. एका कारमध्ये पाच ते सहा मित्र दाटीवाटीने बसून आणि कसलीही काळजी न घेता पार्ट्यांसाठी प्रवास करत असल्याने हा प्रकार धोकादायक ठरत आहे.

दोस्ती करा मोबाईलवर!
या काळामध्ये सर्वांनीच संयम बाळगणे फार आवश्यक आहे. भेटीगाठी होत नसल्या तरी मोबाईलवर संपर्क साधणे कठीण नाही. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातूनदेखील मित्रांना एकमेकांशी भेटल्याचा आनंद घेता येऊ शकतो. विज्ञानाने संपर्कासाठी उपलब्ध करून दिलेली यंत्रणा कोरोनाच्या दिवसात उपयोगाची असल्याने दोस्ती मोबाईलवरच करणे हितावह ठरणार आहे.

Web Title: Be careful! Parties can be fun ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.