योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेअर मार्केटपेक्षा राजकारणाला जास्त बेभरवशाचे क्षेत्र मानले जाते व ते वेळोवेळी सिद्धदेखील झाले आहे. लोअर सर्किट लागलेला शेअर अचानकपणे उसळी घेतो आणि गुंतवणूकदारांची चांदी होते. त्याचप्रमाणे राजकारणाच्या पटलावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मागील पाच वर्षांची कहाणी आहे. तिकीट नाकारल्या गेल्यानंतर काही क्षणांपुरते हताश झालेले बावनकुळे, निराशा बाजूला ठेवून पायाला भिंगरी लावल्यागत अख्खा महाराष्ट्र पालथा घालत भाजपला दणदणीत यश मिळवून देणारे प्रदेशाध्यक्ष आणि आता परत दुसऱ्यांदा मिळालेले मंत्रिपद. मागील पाच वर्षांत बावनकुळे यांना राजकारण व आयुष्यातील ३६० अंशांतील अनुभव मिळाले. बावनकुळे नावाच्या भाजपच्या भरवशाच्या 'स्टॉक' ने यशाचे शिखर गाठत पक्षाला जोरदार 'रिटर्न' मिळवून दिले असून आता त्यांचे नाव नागपूरच्या पालकमंत्रिपदासाठी चर्चेत आहे.
२०१४ ते २०१९ या कालावधीत बावनकुळे यांनी ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री म्हणून राजकारणाचे मैदान गाजविले होते. विशेषतः ऊर्जाखात्यात मैलाचे दगड ठरतील असे अनेक निर्णय व योजना त्यांनी राबविल्या होत्या. मात्र २०१९ च्या तिकीटवाटपादरम्यान त्यांना मोठा धक्का बसला व त्यांना उमेदवारीच नाकारली गेली. तिकीट नाकारले जाणार याची माहिती कळल्यावर लक्ष्मीनगर चौकातील एका नामांकित हॉटेलसमोर मध्यरात्रीच्या सुमारास अस्वस्थ मनाने मारलेल्या येरझारा घालणारे बावनकुळे यांच्या चेहऱ्यावर मोठी हताशा होती. मात्र पक्षशिस्तीचा आदर करत त्यांनी अवघ्या ४८ तासांत स्वतःला सावरले व पक्ष नेतृत्वाच्या निर्देशांनुसार परत कामाला लागले आणि संयमाने राजकीय वाटचाल परत सुरू केली. त्यांची विधानपरिषदेत एन्ट्री झाली. मात्र तोपर्यंत त्यांना दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी चोख पार पाडल्या होत्या व पक्षश्रेष्ठींचा विश्वास जिंकण्यात त्यांना यश आले होते. त्यामुळेच त्यांच्या गळ्यात २०२२ साली प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली. लोकसभेत अपेक्षित मतदान न झाल्यामुळे त्यांच्याबाबत काही जणांनी प्रश्नचिन्हदेखील उपस्थित केले. मात्र बावनकुळे यांच्याकडे संयमाचीच शिदोरी होती. प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी सुस्त बसलेल्या भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अक्षरशः धावायला भाग पडले. इतकेच नाही तर सातत्याने जिल्हानिहाय आढावा बैठका घेत तेथील कच्चे दुवे शोधून संघटन बळकटीचे नियोजन केले. रविवारी त्यांनी राजभवनात शपथ घेतली आणि त्यांच्या आप्तेष्टांच्या डोळ्यात तरळलेले आनंदाश्रू या पाच वर्षांतील संघर्षाची साक्ष देत होते. त्यांना आता कुठले मंत्रिपद मिळेल याबाबत विविध कयास लावण्यात येत असले तरी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद त्यांच्याकडेच येईल अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहेत.
तिन्ही आव्हानांचे 'परफेक्ट' नियोजन प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांना राज्यातील प्रत्येक मतदारसंघावर बारीक नजर ठेवत उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या प्रचाराचे नियोजन करायचे होते. सोबतच महायुतीतील इतर घटक पक्षांसोबतही समन्वय साधण्याचा शिवधन्युष्यदेखील उचलायचा होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या कामठीत परत उमेदवारी मिळाल्याने तेथील तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याची तारेवरची कसरत करायची होती. बावनकुळे यांनी या तिन्ही आव्हानांचे जोरदार नियोजन केले.