नागपूर : देशव्यापी संप आणि सुटी यामुळे ऐन मार्चएण्डिंगच्या पूर्वी सलग चार दिवस बँका बंद राहणार असल्याने बँकेचे कामकाज गडबडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच ग्राहकांना त्रस्त व्हावे लागणार आहे.
खासगीकरणाच्या विराेधासह आपल्या पाच सूत्रीय मागण्यांसाठी बँक कर्मचारी संघटनांनी २८ व २९ मार्च रोजी संप पुकारला आहे. बँकाचे खासगीकरण बंद करावे, सर्व कंत्राटी कर्मचारी आणि बीसीएसला नियमित करावे, डुबीत कर्जाची रक्कम वसुलीवर भर द्यावा, नवीन पेन्शन योजना रद्द करवी आणि डीए लिंक्ड पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी हा दोन दिवसीय संप पुकारण्यात आला आहे. या संपाच्या पूवी २६ मार्चला शनिवार आणि २७ मार्चला रविवार असल्याने बँक कर्मचारी सुटीवर राहतील. त्यामुळे सलग चार दिवस बँक बंद राहतील. परिणामी चेक क्लियरिंगसह इतर बँकिंग कामकाज पूर्णपणे प्रभावित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.