लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : कळमेश्वर-नागपूर मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. ठिकठिकाणी तयार झालेल्या खड्ड्यामुळे हा मार्ग धाेकादायक व त्यावरील प्रवास जीवघेणा बनला आहे. या मार्गाची काही दिवसांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली असली तरी ती केवळ मलमपट्टी ठरली असून, कंत्राटदाराने काही खड्डे न बुजवता तसेच साेडून दिले आहेत.
हा मार्ग काटाेल, नरखेड, सावनेरसह अमरावती जिल्ह्यातील वरूड माेर्शी व इतर तालुक्यांना तसेच मध्य प्रदेशातील पांढुर्णा, साैंसर तालुक्याला जाेडला आहे. या सर्व तालुक्यांसह कळमेश्वर परिसरातील औद्याेगिक वसाहतीमुळे या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. काही वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती करण्यात न आल्याने त्यावर ठिकठिकाणी खड्डे व खड्ड्यांचे पट्टे तयार झाले आहेत. त्यामुळे एकीकडे अपघात हाेत असून, दुसरीकडे वाहनांचे नुकसानही हाेत आहे.
या मार्गावरून प्रवासी वाहतुकीसाेबत शेतमाल व यंत्राेत्पादित मालाचीही सतत वाहतूक केली जाते. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांमध्ये काहींना प्राण गमवावे लागले तर काहींना जखमी व्हावे लागले. त्यामुळे या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, यासंदर्भात ‘लाेकमत’मध्ये वेळावेळी वृत्तही प्रकाशित करण्यात आले. त्या वृत्तांची दखल घेत प्रशासनाने या मार्गाच्या दुरुस्तीचे कंत्राट दिले. कंत्राटदाराने मनमानी कारभार करीत राेडवरील माेजकेच खड्डे बुजविले आणि खड्ड्यांचे पट्टे मात्र तसेच साेडून दिले आहे.
ज्या खड्ड्यांची दुरुस्ती केली, तेही पूर्ववत व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कंत्राटदाराच्या कामावर व त्याला पाठबळ देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे, या मार्गाची तातडीने दर्जेदार दुरुस्ती न केल्यास उपाेषण करण्याचा इशारा तरुणांनी दिला असून, त्यासाठी तरुणांची कृती समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.