लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रहार जनशक्ती पक्षाकडून आर्वी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविणारे तसेच काटोल येथे टँगो चार्ली सैन्य प्रशिक्षण केंद्र चालविणारे जयकुमार बेलखडे यांचा नवा कारणानामा पुढे आला आहे. त्यांनी सीआरपीएफमध्ये नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवित काटोल आणि परिसरातील युवकांना कोट्यवधी रुपयांनी गंडविल्याचा आरोप फसवणूक झालेल्या युवकांनी गुरुवारी नागपूर येथे पत्रकार परिषद घेत केला. या कटात त्यांची पत्नी हर्षलता व साळा राहुल हिरुडकर हाही सहभागी असल्याचा आरोप फसवणूक झालेले आदिल चंद्रगडे व हर्षद रेवतकर यांच्यासह सहा जणांनी केला आहे. काही वर्षापूर्वी बेलखडे यांचे नाव सैन्य भरती पेपरफुट प्रकरणातही आले होते. याप्रकरणी सीबीआयच्या पथकाने काटोल येथे धाड टाकली होती. राज्यातील एका मंत्र्याचा भाचा असल्याचे सांगत धाक दाखविणारे बेलखडे यांच्यावर काटोल पोलिसांनी तातडीने कारवाई करून बेरोजगारांचे पैसे परत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
जयकुमार बेलखडे हे काटोलमध्ये सावरगाव रोडवर टँगो चार्ली कॅम्प चालवून बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देतो. त्याने सीआरपीएफमध्ये नोकरीला लाऊन देण्याचे आमिष देत काही युवकांना लाखो रुपयांनी गंडा घातला आहे. बेरोजगार युवकांना नोकरीला लाऊन देण्याचे आमिष दाखविण्यासह घर विक्री, गाडी खरेदी, प्रिंटिंग प्रेसच्या कामाची देयके आदींच्या माध्यमातून बेलखडे याने १२ जणांची कोट्यवधी रुपयाने फसवणूक केली आहे. यात आणखी काहीजणांची फसवणूक झाल्याची शक्यता असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या बेलखडे विरुद्ध काटोल पोलिस ठाण्यात तसेच नागपूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला राजेश कावडकर, आदिल चंद्रगडे, हर्षद रेवतकर, रोशन बोडखे, आशिष देशमुख, गणेश सुरोसे उपस्थित होते.
"माझ्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहे. मला अडकविण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. मी कुणालाही सीआरपीएफमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिषही दाखविले नाही."
- जयकुमार बेलखडे