लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: नागपूर-वर्धा रोडवरून शेतकरी आंदोलकांना हटविण्याचा आदेश दिल्यामुळे हायकोर्ट शेतकरीविरोधी आहे, अशी बोचरी टीका करणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर वरिष्ठ न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी गुरुवारी कडक ताशेरे ओढले. कडू यांनी हायकोर्टावर निराधार व मनमानी आरोप करू नये. त्यांनी असे आरोप करण्यापूर्वी हायकोर्टाविषयी सखोल अभ्यास करावा, असे न्या. किलोर म्हणाले. गेल्या २८ व २९ ऑक्टोबर रोजी कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी नागपूर-वर्धा रोड बंद करून हजारो निरपराध नागरिकांना वेठीस धरले होते.
आंदोलनामुळे मार्ग होता तब्बल ३५ तास ठप्प
या असंवैधानिक आंदोलनामुळे हा रोड सुमारे ३५ तास बंद होता. परिणामी, रुग्ण, लहान मुले व महिलांचे हाल-बेहाल झाले. व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. आंदोलकांनी स्वत:च्या अधिकारांसाठी लढताना इतर नागरिकांच्यामूलभूत अधिकारांची तमा बाळगली नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून शेतकरी आंदोलकांना नागपूर-वर्धा रोडवरून हटविण्याचे व रोड वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर सरकारनेही शेतकरी कर्जमाफीसाठी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कडू यांनी रोड रिकामा केला.