नागपूर : प्रसिद्ध अवनी वाघिणीची मुलगी मृत पीटीआरएफ-८४ च्या शवाचे रविवारी सकाळी ११ वाजता शवविच्छेदन पार पडले. ३ वर्षे ४ महिन्यांच्या वयात जग साेडून गेलेल्या या वाघिणीच्या पार्थिवावर यानंतर अंत्यसंस्कारही उरकण्यात आले. निसर्गमुक्त केल्यानंतर वाघासाेबत झालेल्या झुंजीत गंभीररीत्या जखमी झालेल्या या वाघिणीचा उपचारादरम्यान शनिवारी रात्री १० वाजता मृत्यू झाला हाेता.
नाेव्हेंबर, २०१८ मध्ये अवनी वाघिणीला ठार मारल्यानंतर दाेन शावकांपैकी ही मादी शावक भटकत हाेती. त्यानंतर, वन कर्मचाऱ्यांनी शाेधाशाेध करून तिला पकडले आणि पेंचच्या तितरामांगी येथील वन पिंजऱ्यात ठेवले. तिला दाेन वर्षांपर्यंत शिकारीसाठी प्रशिक्षितही केले. प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून, तिला निसर्गमुक्त करण्याचा प्रस्ताव तयार केला गेला व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाला पाठविण्यात आला. त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर ५ मार्च राेजी तिला निसर्गमुक्त करण्यात आले. तिच्या हालचाली टिपण्यासाठी रेडिओ काॅलरही लावण्यात आले. मात्र, दाेनच दिवसांत वाघाच्या झुंजीत ती गंभीर जखमी झाल्याची माहिती समाेर आली. वनविभागाच्या पथकाने ८ मार्च राेजी पीटीआरएफ-८४ वाघिणीला रेस्क्यू करून पेंचच्या उपचार केंद्रात आणले. तिच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्यामुळे तिला गाेरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्याची तयारी करण्यात आली. मात्र, शनिवारी रात्री १० वाजता तिने प्राण साेडले.