-योगेश पांडे, नागपूर औरंगजेबाच्या कबरीला हटविण्यावरून आंदोलन करत काही लोकांच्या भावना दुखाविणाऱ्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी कोतवाली पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मुद्द्यावरून रविवारी सकाळच्या सुमारास महालच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आंदोलन झाले होते. यावेळी औरंगजेबाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच पोस्टर फाडण्यात आले. यामुळे महाल परिसरात दिवसभर तणावाची स्थिती होती व पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता.
नऊ आंदोलकांविरोधात गुन्हा
धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका लावत त्यांच्याविरोधात एका गटाच्या काही लोकांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र त्याच दिवशी संध्याकाळी तणाव वाढला आणि चिटणीस पार्क चौक, भालदारपुरा, हंसापुरी येथे जाळपोळ-दगडफेक झाली.
न्यायालयाकडून जामिनावर सुटका
सकाळच्या प्रकरणात विहिंपच्या कार्यकर्त्यांचा पोलिसकडूनां शोध घेण्यात येत होता. बुधवारी दुपारी चार वाजता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आठ कार्यकर्त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. पोलिसांनी त्यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आ.के.गायकवाड यांच्यासमोर उपस्थित केले. न्यायालयाने सर्वांची जामिनावर सुटका केली.