वर्धा : संगणक प्रशिक्षणाच्या नावावर आर्वी येथील एका अल्पवयीन तरुणीला लातूरला बोलाविले. तेथून पुण्याला घेऊन जाताना पुण्यानजीक हायवेवरील एका लॉजवर नेऊन मित्रासह तिच्यावर अतिप्रसंग केला. ही खळबळजनक घटना शुक्रवारी आर्वी येथे उघडकीला आली. याप्रकरणी आर्वी पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन महेश पाटील रा. लातूर व त्याच्या निखिल नामक मित्राविरुद्ध कलम ३७६ ड, ३६३, ३६६ व लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून रक्षण कायदा २०१२ कलम ४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आर्वी येथील आंबेडकर वॉर्डातील १७ वर्षीय तरुणीशी लातूरच्या महेश पाटील याने भ्रमणध्वनीवर संपर्क साधून संगणक प्रशिक्षणाचे आमिष दिले. प्रशिक्षण मोफत असल्यामुळे तिनेही त्याला होकार दिला. ती अलगद जाळ्यात अडकत असल्याचे हेरुन महेशने तिला चाचपणी करण्यासाठी आधी वर्धेला बोलविले. नंतर कागदपत्रांसह लातूरला बोलाविले. त्याच्या सांगण्यानुसार ६ मे रोजी ती एकटीच लातूरला पोहोचली. तिथे महेश तिला बसस्थानकावर घ्यायला आला. त्याने तिची राहण्याची व जेवणाची सोय एका लॉजवर केली. यानंतर त्याने तिला काही कामानिमित्त पुण्याला जावे लागेल, अशी बतावणी केली. महेश नियोजित कटानुसार ७ मे रोजी तिला घेऊन पुण्याला गेला. जाताना लातूर-पुणे हायवेवर पुण्याजवळील एका लॉजवर त्याने तिला एका खोलीत थांबविले. बाहेरुन काम आटोपून येतो म्हणून तो तेथून निघून गेला. काही वेळाने महेश निखिल नामक मित्रासह लॉजवर पोहोचला. त्यानंतर त्या दोघांनीही तिच्याशी बळबजरीने कुकर्म करुन तिथे त्याच अवस्थेत सोडून पोबारा केला. अशा बिकट परिस्थितीत कुठेही घडलेल्या प्रकाराची वाच्यता न करता स्वत:ला सावरत ती कशीबशी शुक्रवारी आर्वीला पोहोचली. घडलेला घृणास्पद प्रकार कुटुंबीयांना सांगितला. यानंतर आर्वी ठाण्यात तक्रार नोंदविली. घटना लातूरपासून सुरू झाल्यामुळे आर्वी पोलीस सदर प्रकरण लातूर पोलिसांकडे सोपविणार आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
आर्वीच्या तरुणीवर पुण्यात बलात्कार
By admin | Updated: May 10, 2014 00:41 IST