बेलाेना : शेतीच्या वहीवाटीसाठी पांदण रस्त्याची आवश्यकता असते. परंतु वारंवार मागणी करूनदेखील पांदण रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे पांदण रस्त्यांची दुरुस्ती हाेणार कधी, असा प्रश्न परिसरातील शेतकरी विचारत आहेत.
खरीप हंगाम ताेंडावर आहे. शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी तसेच खते, बी- बियाणे व इतर शेतीपयाेगी अवजारे नेण्यासाठी पांदण रस्ते चांगले असणे आवश्यक आहे. मात्र परिसरातील बहुतांश पांदण रस्त्यांची दुरुस्ती वा खडीकरण झाले नसल्याने शेतकऱ्यांना शेतीची वहीवाट करताना अडचणींचा सामना करावा लागताे. संबंधितांकडे वारंवार मागणी करूनही पांदण रस्त्याचे काम हाेत नाही. एखादा पांदण रस्ता मंजूर केल्यानंतर त्याची लांबी कमी असते. त्याचा शेतकऱ्यांना उपयाेग हाेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता प्रशासनाने पांदण रस्त्यांच्या कामांना मंजुरी देऊन शेतकऱ्यांच्या वहीवाटीसाठी पांदण रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.