कामठीत सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या बांधकामात घोटाळानागपूर : कामठी येथील सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या बांधकामातील लाखोच्या घोटाळ्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहम्मद सादीक उमर यांच्या न्यायालयाने कनिष्ठ अभियंत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. सुरेश रघुनाथ बोरकर(५७) रा. नगर परिषद कामठी, असे या आरोपी कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. हा घोटाळा त्याने ३ मार्च २०१४ ते ३ डिसेंबर २०१५ या काळात केला आहे. या प्रकरणाची हकीकत अशी, नागरी दलित वस्ती योजनेच्या अंतर्गत कामठी येथील हॉकी बिल्डिंग ते आसाराम कांबळे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. या कामाचे देयक १३ मे २०१५ रोजी १२ लाख ५३ हजार १८५ रुपये देण्यात आले. या प्रकरणातील आरोपीने बनावट कागदपत्र तयार करून ते खरे आहे, असे भासवले. खोटे हिशेब तयार करून या कामाचे पुन्हा देयक तयार केले. ते वटवून ५ लाख ८६ हजार ७८९ रुपयांची उचल करून शासनाची फसवणूक केली. अर्थात एकाच कामाचे दोनवेळा पैसे घेण्यात आले. रवींद्र विठ्ठलराव पांढरे यांच्या तक्रारीवरून बोरकरविरुद्ध कामठी पोलीस ठाण्यात भादंविच्या ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७७ (अ), ४७१, १६६ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या अभियंत्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असता त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अभय जिकार यांनी काम पाहिले. उपनिरीक्षक आशिष चेचरे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
अभियंत्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By admin | Updated: December 14, 2015 03:19 IST