अंमली पदार्थ विरोधी दिन; ६ महिन्यात अंमली पदार्थांचे नागपुरात ९८ गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2022 07:00 AM2022-06-26T07:00:00+5:302022-06-26T07:00:07+5:30

Nagpur News मागील फक्त ६ महिन्यात अंमली पदार्थांचे नागपुरात ९८ गुन्हे घडले असून ६५ लाख रुपयांचा माल या कारवाईतून हस्तगत करण्यात आला आहे.

Anti-drug day; 98 drug cases in Nagpur in 6 months | अंमली पदार्थ विरोधी दिन; ६ महिन्यात अंमली पदार्थांचे नागपुरात ९८ गुन्हे

अंमली पदार्थ विरोधी दिन; ६ महिन्यात अंमली पदार्थांचे नागपुरात ९८ गुन्हे

Next
ठळक मुद्देतरूणाई गुंतली व्यसनात, सर्वांपुढेच सामाजिक आव्हान

 

गोपालकृष्ण मांडवकर

नागपूर : उपराजधानी नागपूरला अंमली पदार्थांचा पडलेला विळखा नवा नाही. मात्र मागील ५ ते ६ वर्षात यात मोठ्या प्रमाणावर गुंतत चाललेली तरुणाई आणि त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न यामुळे मोठे सामाजिक आव्हान सर्वांसमोर निर्माण झाले आहे. गुन्ह्यांची संख्या एवढी की मागील फक्त ६ महिन्यात अंमली पदार्थांचे नागपुरात ९८ गुन्हे घडले असून ६५ लाख रुपयांचा माल या कारवाईतून हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांच्या मते, नागपुरात ओडिसा आणि विशाखापट्टणम या भागातून गांजा येतो तर मुंबईमधून एमडी पुरविली जाते. ही तस्करी रेल्वे, ट्रक, तसेच चोरीच्या वाहनांमधून झाल्याच्या नोंदी आहेत. मागील ६ महिन्यात गांजा तस्करीतून दोन वेळा १९८ किलो आणि १०७ किलो जांगा पकडला गेला, तर दोन घटनांमध्ये प्रत्येकी ५७ ग्रॅम आणि ४६ ग्रॅम एमडी पकडण्यात आली.

गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम

नागपूर शहरातील तरुणाई अमली पदार्थाच्या जाळ्यात अडकू नये, यासाठी गुन्हे शाखा विभागामार्फत विशेष मोहीम शहरात राबविली जात आहे. ‘जनजागृती आणि दोष सिद्धी’ या द्विस्तरीय सूत्रावर ही कारवाई सध्या सुरू आहे. आयपीएस दर्जाचे अधिकारी विशेष मोहीम राबवीत आहेत. गुन्हे शाखेच्या उपायुक्तांकडे ही जबाबदारी देण्यात आली असून प्रत्येक पोलीस ठाणे निहाय आढावा घेतला जात आहे.

अमली पदार्थांच्या अति सेवनाने

- मेंदूमधील पेशींच्या क्रियेत बिघाड

- व्यसनी व्यक्ती इतरात मिसळणे टाळतो

- वेगवेगळे भास होतात, त्यामुळे शारीरिक हालचालींवरील नियंत्रण सुटते

- सामाजिक व आर्थिक व्यवहारांचे भान राहत नाही

- विळख्यात अडकलेल्या व्यक्तीला ठरल्यावेळी ‘खुराक’ मिळाली नाही तर त्याचे शारीरिक आणि मानसिक संतुलन बिघडते- हे पदार्थ महाग असल्याने व्यसनी व्यक्ती प्रसंगी चोरीसारख्या कोणत्याही स्तरावर जातो

वन आणि कृषी विभागाचे सहकार्य

खसखस किंवा गांजा पिकांची अवैध लागवड होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी वन आणि कृषी विभागाचे सहकार्य घेतले जात आहे. गठीत केलेल्या समितीमध्ये या विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

ऑनलाईनच्या काळात मिळतो घरबसल्या ‘माल’

अमली पदार्थांच्या तस्करीसाठी वेगवेगळे मार्ग वापरले जातात. सध्याच्या ‘ऑनलाइन’च्या काळात ‘ऑनलाइन फार्मसीज’ किंवा ‘इंटरनेट फार्मसीज’ हा नवा मार्ग गुन्हेगारांनी शोधला आहे. यात कोणीही कुठूनही दुकानांमध्ये ड्रग्जची ऑनलाइन मागणी नोंदवू शकतो. ग्राहकाला घरबसल्या ‘माल’ मिळतो. त्यामुळे आता नागपूर पोलिसांनी पार्सल व्यवसायातील व्यक्तींवरही नजर ठेवणे सुरू केले आहे.

हा प्रकार रोखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांचे नाक, डोळे, कान व्हावे. आपल्या घरातील तरुणाई कोणत्याही व्यसनाला बळी पडणार नाही, याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याचे हे दिवस आहेत. कुठलीही संशयास्पद हालचाल आढळली तर पोलिसांना माहिती द्यावी.

- चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त, नागपूर

Web Title: Anti-drug day; 98 drug cases in Nagpur in 6 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.