लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील आघाडीची स्फोटक उत्पादन कंपनी असलेल्या 'सोलार एक्सप्लोजिव्ह'मध्ये गुरुवारी मध्यरात्री झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या आणखी एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मृत्यू पडलेल्यांची संख्या आता दोन झाली आहे. दरम्यान, कंपनीकडून मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
४ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास 'सोलार एक्सप्लोजिव्ह' मधील 'क्रिस्टलायझेशन' इमारतीत हा स्फोट झाला. तेथे स्फोटकांना तांत्रिक पद्धतीने वाळवून त्यांचे स्फटिकीकरण सुरू होते. तेथे अचानक तापमान वाढले व स्फोट झाला.
या स्फोटात मयूर दशरथ गणवीर (२५, रा. चंद्रपूर) याचा मृत्यू झाला होता. तर सुरज कुमार, निकेश इरपाची, प्रभात जेश्रा, योगेश सिंग हे गंभीर जखमी झाले होते. निकेश इरपाची (३२, नरोडा, वर्धा) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात एकूण ४० जण जखमी झाले होते व त्यातील २९ जण किरकोळ जखमी होते.
मृतांच्या कुटुंबातील एकाला नोकरी
दरम्यान, 'सोलार एक्सप्लोजिव्ह'मधील मृताच्या कुटुंबीयांना कंपनीकडून २५ लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. तसेच मृतकांच्या पत्नीला १५ हजार रुपयांची पेंशन व कुटुंबातील एकाला नोकरीदेखील देण्यात येणार आहे.
'पेसो'च्या पथकाकडून पाहणी
दरम्यान, या स्फोटानंतर तेथील कारणे शोधणे महत्त्वाचे झाले आहे. 'पेसो'च्या पथकाने तेथे दोन दिवस पाहणी केली. स्फोटाच्या नेमक्या कारणांचा शोध लावण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच संरक्षण क्षेत्रात कंपनीचे मोठे काम असल्याने संरक्षण मंत्रालयाचे पथकदेखील तेथे येण्याची शक्यता आहे.