नागपूर : लॉकडाऊनच्या काळात किराणा दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होत असल्याने कोरोना संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. गर्दीवर नियंत्रण आणण्यात दुकानदार यश येत नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
रविवारी सकाळी नंदनवन येथील एका किराणा दुकानात ३०पेक्षा जास्त ग्राहक सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता उभे होते. ग्राहक खरेदी करताना १५ ते २० मिनिटे उभे राहतात. ग्राहक जीवनावश्यक वस्तूंचा अनावश्यक साठा करीत असल्याचे गर्दीवरून दिसून येते.
शटर वर-खाली करून व्यवसाय सुरू
प्रशासनाच्या कारवाईनंतरही अनेक बाजारपेठांमध्ये दुकानदार शटर वर-खाली करून व्यवसाय करीत असल्याचे चित्र आहे. दुकाने बंद दिसत असली तरीही ग्राहक आल्यानंतर शटर वर होते, अशी युक्ती बहुतांश दुकानदारांनी अवलंबविली आहे. तसेच पानठेल्यांवर छोट्या दरवाजातून व्यवसाय सुरू आहे. कोरोना वेगाने वाढत असतानाही दुकानदार सुधारण्यास तयार नाहीत.
दुकानात गर्दी होत असल्याच्या कारणाने इतवारी घाऊक किराणा मार्केट आणि धान्य बाजार असोसिएशनने शनिवार व रविवारी दुकाने बंद ठेवण्यासह सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यास हातभार लागणार आहे.
लॉकडाऊनमध्ये बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे. पण चहा टपरी व पानठेले धडाक्यात सुरू आहेत. या ठिकाणीही लोकांची गर्दी दिसून येत आहे. गर्दीकडे कुणाचेही लक्ष नाही. लोकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे कोरोना संसर्ग वाढीसह समस्या वाढत आहेत. लॉकडाऊनमध्ये थोडी फार सूट मिळाल्याने लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत.