विकास आमटे : नागभूषण पुरस्कार प्रदान समारंभ नागपूर : बाबांनी सुरू केलेल्या आनंदवनातून आतापर्यंत २५ लाख रुग्णांवर उपचार करण्यात आले पण आजही १६०० रुग्ण येथे आहेत. एखादा पुरस्कार स्वीकारताना बाबांनी सुरू केलेल्या या कार्याचा उष्टा पुरस्कार मी स्वीकारतो आहे, अशी भावना मनात येते. आनंदवनच्या कार्यासाठी मला पुरस्कार मिळतो पण तो माझा एकट्याचा नाहीच. रुग्णांनी स्वेच्छेने स्वीकारलेल्या जेलचा मी जेलर आहे. आनंदवन सारखा प्रकल्प समाजात असणे वाईट आहे. या प्रकल्पाचे काम आता संपायला हवे, असे मत महारोगी सेवा समिती, वरोराचे डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केले. नागभूषण अवॉर्ड फाऊंडेशनतर्फे प्रदान करण्यात येणारा नागभूषण पुरस्कार स्वीकारताना विकास आमटे बोलत होते. बाबुराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी. खा. दत्ता मेघे तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रासायनिक खते मंत्री हंसराज अहिर, न्या. व्ही. एस. सिरपूरकर, प्रभाकरराव मुंडले, गिरीश गांधी, सत्यनारायण नुवाल, राजेन्द्र पुरोहित, डी. आर. मल, ब्रजकिशोर अग्रवाल, सुरेश शर्मा, मोहन अग्रवाल उपस्थित होते. मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते विकास आमटे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते. याप्रसंगी हंसराज अहिर म्हणाले, सामाजिक बांधिलकी सांभाळणाऱ्या एका संस्कारक्षम व्यक्तीमत्वाला हा पुरस्कार प्रदान करताना मला अभिमान वाटतो. आनंदवनला टायरचे बांध आणि सेंद्रिय शेतीचा उपयोग मी अनुभविला आहे. याच पद्धतीने देशात हा प्रयोग राबविणे गरजेचे असून त्यासाठी माझे मंत्रालय प्रयत्न करीत आहे. आमटेंनी कधीही मागितले नाही, ते काम करीत राहिले. त्यांचे काम यशस्वी व्हावे, अशी शुभेच्छा त्यांनी दिली. दत्ता मेघे म्हणाले, काही व्यक्तींमुळे पुरस्काराचे महत्त्व वाढते. विकास आमटेंमुळे या पुरस्काराचे महत्त्व वाढले आहे. आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वर्गणी गोळा करुन ४६ लाख रुपये आनंदवनला दिले. याचाच अर्थ नव्या पिढीत संवेदनशीलता आहे. आनंदवनच्या कार्यात मदत करायला मलाही आवडेल. न्या. सिरपुरकर म्हणाले, आचार्य अत्रेंनी बाबांना साष्टांग नमस्कार केला तेव्हापासून मला आमटे कुटुंबियांचे महत्त्व पटायला लागले. विकास बाबांचेच प्रतिरूप आहे. निर्भयपणा, रसिकता, जिद्द हे गुण विकासने बाबांपासूनच घेतले. गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक तर शुभदा फडणवीस यांनी संचालन केले. याप्रसंगी नितीन गडकरींचा संदेश रेकॉर्डद्वारे ऐकविण्यात आला.(प्रतिनिधी) बाबांना नोबेल पुरस्कार मिळाला होताबाबा आमटे यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता पण अनेकांना हे माहीत नाही. बाबांना पुरस्कार महत्त्वाचा वाटला नाही. दोन वेळा लाभलेले पद्म पुरस्कार त्यांनी घेतले नाही. पण पद्म पुरस्कार नाकारणे हा देशद्रोह मानला जातो त्यामुळेच बाबांच्या निधनांनतर त्यांना श्रद्धांजलीदेखील वाहण्यात आली नव्हती. आतापर्यंत बाबांच्या कार्याने प्रेरित होऊन सचिन तेंडुलकर, कपिलदेव, पु. ल. देशपांडे, लतादीदी, जगजितसिंग, गो. नि. दांडेकर, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे आदी अनेकांनी या प्रकल्पाला मदत केली. त्यामुळेच बाबांच्या कार्यपथावर चालताना मलाही पुरस्कारापेक्षा काम मोेठे वाटते, असे विकास आमटे म्हणाले.
आनंदवन प्रकल्प आता संपायला हवा
By admin | Updated: September 16, 2015 03:33 IST